चाळीसगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील कळमडू (ता. चाळीसगाव) येथे हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. वडिलांच्या अकाली निधनाचे दुःख मनात दाटून आलेले असतानाही मुलगी नेहा निकम हिने बारावीचा गणिताचा पेपर देत धैर्य आणि कर्तव्यनिष्ठेचा आदर्श घालून दिला.
कळमडू येथील कृषी केंद्राचे चालक अंकलेश विठ्ठल निकम (वय ४८) हे गेल्या वीस वर्षांपासून काही मित्रांसह दररोज रेल्वेने चाळीसगाव ते राजमाने असा प्रवास करीत होते. शनिवारी, दि. २१ रोजी पहाटे सव्वासहा वाजता ते चाळीसगाव रेल्वे स्थानक येथे पोहोचले. गाडी सुटण्यापूर्वीच त्यांना अचानक छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. प्रकृती खालावत असल्याची जाणीव होताच त्यांनी तत्काळ घरी फोन करून मुलाला बोलावून घेतले.
मुलगा स्थानकावर दाखल होताच वडिलांना तातडीने खासगी दवाखान्यात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. निकम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. याच दिवशी नेहा हिचा बारावीचा गणिताचा महत्त्वाचा पेपर कोळगाव येथील परीक्षा केंद्रावर होता. घरातील परिस्थिती अत्यंत वेदनादायी असतानाही ग्रामस्थांनी आणि नातेवाईकांनी तिला धीर देत परीक्षा देण्यासाठी पाठवले. डोळ्यांत अश्रू आणि मनात वडिलांच्या आठवणींचा कल्लोळ असतानाही नेहाने परीक्षा केंद्रावर जाऊन पेपर पूर्ण केला.
पेपर संपल्यानंतर ती थेट घरी परतली आणि वडिलांचे अखेरचे दर्शन घेतले. तिच्या या धैर्यपूर्ण निर्णयामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गावकऱ्यांनी निकम कुटुंबीयांना सांत्वन केले असून नेहाच्या जिद्दीचे कौतुक केले जात आहे. अत्यंत कठीण प्रसंगातही शिक्षणाला प्राधान्य देत नेहाने दाखवलेले धैर्य अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. दुःखाचा डोंगर कोसळला असतानाही आयुष्याच्या लढाईत खंबीरपणे उभे राहण्याचा संदेश तिच्या कृतीतून उमटला आहे.



