जळगाव : प्रतिनिधी
दारुच्या नशेत रेल्वे रुळावर बसलेल्या तरुणांना शिवीगाळ केल्याचा रागातून अमर वसंत सपकाळे (वय ४२, रा. खंडेराव नगर) या तरुणाचा दोघांनी दगडाने ठेचून निघृण खून केला. ही घटना रविवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास उघडकीस आली. मृतदेह खंडेराव नगराजवळील रेल्वे रुळांमध्ये पडलेला मिळून आल्याने सुरुवातीला रेल्वेची धडक लागून मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवीला जात होता. परंतू मृतदेहाजवळ रक्ताने माखलेला दगड मिळून आल्याने पोलिसांनी खून झाल्याचे निष्पन्न केले. पोलिसांनी १२ वीचे पेपर देणाऱ्या अल्पवयीन मुलासह एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील खंडेराव नगरात अमर सपकाळे हा तरुण कुटुंबियांसह वास्तव्यास होता. हातमजूरी करुन तो कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होता. गेल्या दोन दिवसांपासून अमर हा बाहेरगावी गेलेला होता. शनिवारी सकाळी तो छत्रपती संभाजी नगर येथे शालकाकडे गेला होता. त्यानंतर सायंकाळी तो जळगावाला परतला मात्र घरी गेलेला नव्हता. शनिवारी रात्रीच्या सुमारास अमर हा दारुच्या नशेत तो खंडेराव नगराजवळील उड्डाणपुलावर गेला त्याठिकाणी दोन रेल्वे रुळाच्या मधल्या मोकळ्या जागेत दोन तरुण सिगरेट पित बसलेले होते. दारुच्या नशेत असलेल्या अमरने त्यांच्याकडे बघत शिवीगाळ केली. त्या दोघांपैकी एकाने अमरला दगड मारुन फेकला.
सुरुवातीला अमर सपकाळे याचा रेल्वेची धडक लागून मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविला जात होता. त्याच्या कुटुंबियांकडून देखील कोणाविरुद्ध शंका उपस्थित केली नव्हती. मात्र रेल्वेच्या धडकेत मयताच्या अंगावर इतरत्र जखमा झाल्या असत्या. परंतू अमरच्या अंगावर जखमा नसल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, पोनि राजेंद्र गुंजाळ यांनी घातपाताच्या दिशेने तपास सुरु केला.
पंचनाला करुन मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आल्यानंतर रामानंद नगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील कर्मचारी पोहेकॉ अजित पाटील, निलेश पाटील, अजय सपकाळे, सागर देवरे यांनी घटनास्थळी पुरावे शोधण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांना मृतदेहापासून शंभर मिटर अंतरावर रक्ताने माखलेला दगड मिळून आला. फॉरेन्सीकच्या पथकाने दगडावरील रक्ताच्या नमुने तपासल्यानंतर अमर सपकाळे याचा खून झाल्याचे निष्पन्न झाले.
अमर सपकाळे याचा खून झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांकडून संशयित मारेकऱ्यांचा शोध घेतला जात होता. दरम्यान, एलसीबीसह रामानंद नगर पोलीस ठाण्यातील कर्मचारी हे परिसरातील सीसीटीव्हीसह खबरीद्वारे माहिती गोळा करीत होते. यावेळी तांत्रीक पुराव्यांच्या आधारे हा खून अल्पवयीन मुलासह त्याच्या मित्राने केल्याचे समजले. त्यानुसार पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, पोहेकॉ सुशिल चौधरी, जितेंद्र राजपूत, जितेंद्र राठोड, अजित पाटील, निलेश पाटील, योगेश बारी, अजय सपकाळे यांच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले



