जळगाव : प्रतिनिधी
कालंका माता चौफुलीजवळ शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत प्रभाकर पाटील (वय ५५, रा. तेली चौक) या हातमजुराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाकर पाटील हे शुक्रवारी रात्री कामावरून परतताना त्यांनी भाजीपाला खरेदी केला व ते पायी घराकडे निघाले होते. मात्र, कालंका माता चौफुलीजवळ भरधाव डंपरने त्यांना जोरदार धडक दिल्याने ते चाकाखाली आले. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी डंपरच्या काचा फोडत महामार्गावर रास्तारोको केल्याने तणाताचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच आमदार सुरेश भोळे यांनी घटनास्थळी भेट देऊन नागरिकांच्या भावना जाणून घेतल्या. याच ठिकाणी वर्षभरापूर्वी एका मुलीचाही अपघाती मृत्यू झाला होता. त्यानंतर हा अपघात झाल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाविरुद्ध रोष दिसून आला. बायपास सुरू झाल्यानंतर शहरातील महामार्गावर झालेला हा पहिलाच मोठा अपघात आहे. याप्रकरणी डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. पोलिसांनी डंपर ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे.
अपघाताची बातमी पसरताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. संतप्त जमावाने डंपरवर दगडफेक करत तोडफोड केली आणि रस्ता अडवून धरला. यामुळे महामार्गावरील वाहतूक सुमारे पाऊण ते एक तास पूर्णपणे खोळंबली होती. एमआयडीसी आणि शनिपेठ पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ धाव घेऊन जमावाची समजूत काढली आणि तणाव शांत केला.



