जळगाव : प्रतिनिधी
दिल्ली येथील भाजप खासदार मनोज तिवारी यांच्या ताफ्यातील पोलिस एस्कॉर्ट वाहनाने रिक्षाला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात रिक्षातील आठ जण गंभीर जखमी झाले असून सर्वांना उपचारासाठी जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी साडेसात वाजता मेहरुण तलावाजवळील नेहरू नगर परिसरात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजप खासदार मनोज तिवारी हे पा-रोळा येथे धार्मिक कार्यक्रमासाठी आले होते. त्यांना ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा असल्याने जिल्हा पोलिस दलातर्फे एस्कॉर्ट वाहन देण्यात आले होते. खासदार तिवारी यांना संभाजीनगर हद्दीत सोडून देऊन हे पोलिस वाहन जळगावकडे परत येत असताना हा अपघात झाला.
मेहरुण तलावाजवळील नेहरू नगर परिसरात रस्त्यावरील मोठा खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि हे वाहन समोरून येणाऱ्या रिक्षावर जाऊन आदळले. या धडकेत रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला असून पोलिस एस्कॉर्ट वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात ज्योती एकनाथ बारी (४५), एकनाथ रामदास बारी (५०), अश्विनी शुभम कुमावत (२५), रत्ना शंकर मिस्तरी (४८), सुशीला दिलीप बारी (५५), कीर्ती शिवाजी बारी (४०), कुणाल शिवाजी बारी (१३) आणि चार वर्षांची चिमुकली प्रियांशी शुभम कुमावत हे आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमी हे जळगाव शहरातील हरी विठ्ठल नगर परिसरातील रहिवासी आहेत.
अपघातानंतर सर्व जखमींना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. जखमींनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, रस्त्यांची दुरवस्था व जीवघेणे खड्डे हेच अपघातास कारणीभूत ठरल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी रस्त्यांच्या खराब स्थितीबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे.



