जळगाव : प्रतिनिधी
कामानिमित्त सर्वजण बाहेर गेलेले असताना बंद घरात आग लागून टीव्ही, फॅन, कपडे, भांडे यासह घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती घरमालकाने दिली आहे. ही घटना ३० जानेवारी रोजी तालुक्यातील कुसुंबा येथे घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, मजुरी काम करणारे सुनील लहू सोनवणे (वय ४८) यांचे कुसुंबा येथे घर आहे. घरातून धूर येत असल्याचे लक्षात आल्यानंतर आजूबाजूच्या रहिवाशांनी घरमालकास माहिती दिली. आग वाढत जात असल्याने शेजारील मंडळींनीच पाणी मारून ती विझविली. मात्र या आगीत घरातील टीव्ही, सिलिंग व टेबल फॅन, पलंग, भांडे, कपडे यासह घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले.
या आगीत घरातील सर्वकाही जळाले असून केवळ अंगावरील कपडे शिल्लक असल्याने संसार उघड्यावर आल्याचे घरमालक सुनील सोनवणे यांनी सांगितले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात आगीची नोंद करण्यात आली आहे.



