मुंबई : वृत्तसंस्था
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या २८ जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. अवघ्या चौथ्याच दिवशी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर या निर्णयावर विरोधी पक्षांकडून टीकेची झोड उठली आहे.
या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वावर कठोर शब्दांत टीका केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी बैठकांवर बैठका घेतल्याचा संदर्भ देत, राज ठाकरे यांनी थेट प्रफुल्ल पटेल यांना लक्ष्य केले.
राज ठाकरे म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेससारख्या अस्सल मराठमोळ्या, रांगड्या आणि मातीतल्या पक्षाचा अध्यक्ष हा मराठी असावा. मराठा समाजातील ‘पाटील’ असावा; ‘पटेल’ नको,” अशी उपहासात्मक टीका त्यांनी केली. गेल्या काही काळात महाराष्ट्राच्या राजकारणाचा अक्षरशः विचका झाला आहे, अशी टीप्पणीही त्यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, “आज दिवसभर ज्या घडामोडी सुरू आहेत, त्यावर बोलावंच लागेल. राष्ट्रवादी काँग्रेससारख्या मराठमोळ्या पक्षाचा अध्यक्ष कोण असावा, यावर स्पष्ट भूमिका घेण्याची ही वेळ आहे,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले. राज ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले असून, राष्ट्रवादी काँग्रेसकडून यावर काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



