मुंबई : प्रतिनिधी
“निवडणूक जिंकण्यासाठी रेवड्या वाटल्या जात असून त्यामुळे राज्य आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे,” असा गंभीर आरोप करत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्याची आर्थिक परिस्थिती लक्षात न घेता केवळ सत्तेसाठी जनतेच्या पैशांची उधळपट्टी करण्याचा अधिकार सरकारला कोणी दिला, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
वडेट्टीवार म्हणाले की, राज्यावर महसुली तुटीचा बोजा सातत्याने वाढत आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’सारख्या लोकानुनयी योजनांमुळे महाराष्ट्र महसुली तुटीत गेला आहे. २९ जानेवारी रोजी सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पातील आर्थिक सर्वेक्षणातही महिला कामगारांच्या श्रमशक्तीतील सहभागावर या योजनांचा नकारात्मक परिणाम झाल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.
ते पुढे म्हणाले की, लोकानुनयी योजना आणि वाढता कर्जबोजा यामुळे राज्य सरकारचे जमा-खर्चाचे गणित पूर्णपणे बिघडले आहे. याचा फटका चालू आर्थिक वर्षातील विविध विकासकामांच्या तरतुदींना बसत आहे. निवडणुकीच्या तोंडावर अशा योजना जाहीर करून निवडणुका जिंकल्या जातात, मात्र यावर निवडणूक आयोग काय भूमिका घेतो, असा सवालही त्यांनी केला.
निवडणूक आयोगाने कठोर भूमिका घेणे आवश्यक असताना तो ती घेऊ शकत नाही. उलट तो सरकारच्या हातातील खेळणे बनल्याचा आरोप करत वडेट्टीवार यांनी आयोगाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
याचबरोबर त्यांनी घटनात्मक पदांबाबतही सरकारवर टीका केली. विरोधी पक्षनेतेपद हे घटनात्मक पद असताना ते रिकामे ठेवण्याचा अधिकार कुणाला आहे, यावर संशोधन करण्याची गरज काय, असा सवाल त्यांनी केला. उपमुख्यमंत्री पद हे घटनात्मक नसतानाही दोन उपमुख्यमंत्री नेमले जातात, हेही त्यांनी अधोरेखित केले.



