मुंबई : वृत्तसंस्था
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला असून, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सत्तासंतुलन व नेतृत्वाबाबत हालचाली तीव्र झाल्या आहेत. मात्र, या प्रक्रियेत शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांना विश्वासात न घेतल्याचे समोर आल्याने पवार कुटुंबात अंतर्गत नाराजी उफाळून आली आहे.
शरद पवार यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय घाईगडबडीत घेतल्याचे स्पष्ट केले. “सुनेत्रा पवारांबाबतचा निर्णय एवढ्या घाईने का घेण्यात आला, याची मला माहिती नाही. या संदर्भात माझ्याशी कोणतीही चर्चा झाली नाही,” असे पवार म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, गेल्या चार महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या एकत्रीकरणाबाबत चर्चा सुरू होती. अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात यासंदर्भात संवाद सुरू होता. १२ जानेवारी रोजी विलीनीकरणाबाबत निर्णय जाहीर होणार होता, मात्र आता या प्रक्रियेला खंड पडल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत की नाही, याचीही आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार यांच्या संदर्भातील महत्त्वाचे निर्णय घेताना अजित पवार गटाच्या नेत्यांनी शरद पवार किंवा सुप्रिया सुळे यांच्याशी कोणतीही चर्चा केलेली नाही. मुंबईत झालेल्या बैठकींमध्ये घाईघाईने निर्णय प्रक्रिया राबविल्याबद्दल पवार कुटुंबातील काही वरिष्ठ सदस्यांनी नाराजी व्यक्त केल्याचे समजते. “इतकी घाई करण्याची गरज नव्हती,” अशी भावना व्यक्त करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री बारामतीतील ‘गोविंदबाग’ निवासस्थानी शरद पवार यांनी महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार उपस्थित होते. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसमधील बदलत्या राजकीय घडामोडी, अजित पवार गटाकडून उचलली जाणारी पावले तसेच पुढील राजकीय भूमिका यावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे.
अजित पवारांच्या पश्चात पक्षाची धुरा कोणाकडे जाणार, सुनेत्रा पवारांची नेमकी भूमिका काय असेल, याबाबत सध्या सस्पेन्स कायम आहे. शरद पवारांना डावलून निर्णय घेतले जात असल्याच्या चर्चेमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा संघर्षाची चिन्हे स्पष्ट होत असून, बारामतीतून शरद पवार पुढे काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.



