भुसावळ : प्रतिनिधी
वाहनचोरीच्या वाढत्या प्रकरणांवर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई केली आहे. जामनेर व भुसावळ परिसरातील चोरीच्या घटनांचा उलगडा करत पोलिसांनी तीन मोटारसायकली जप्त केल्या आणि दोन तरुणांना ताब्यात घेतले. ही कारवाई पोलिसांच्या सतर्कतेने आणि गोपनीय माहितीनुसार पार पडली.
पोलिसांनी जामनेरमधून अनुराग लक्ष्मण सूनगत (वय १९) आणि दर्शन बाप्पू चव्हाण (वय १८) यांना ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्यांनी त्यांच्या एका साथीदारासह मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. तपासा दरम्यान जामनेर पोलिस स्टेशनमध्ये दाखल गुन्हां मधील दोन मोटारसायकली आणि भुसावळ पोलिस स्टेशनमध्ये दाखल गुन्हांमधील एक मोटारसायकल असा एकूण तीन मोटारसायकलींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हा मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी व अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक शरद बागल, ग्रेड पोलिस उपनिरीक्षक रवी नरवाडे आणि पथकातील इतर अधिकाऱ्यांनी संयुक्तरीत्या पार पाडली.



