भुसावळ : प्रतिनिधी
भुसावळ शहरात सुरू असलेल्या अवैध सट्टा व जुगारप्रकरणी पोलीस प्रशासनाने तात्काळ धडक कारवाई केली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील जामनेर रोडवरील हॉटेल प्रीमियमजवळ सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्ती अवैधरित्या जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकत त्यांना रंगेहाथ पकडले. या कारवाईत रवींद्र रामचंद्र दांईजे (रा. जाम मोहल्ला, भुसावळ) आणि योगेश शंकर जाधव (रा. बद्री प्लॉट, भुसावळ) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून २ हजार २४० रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
दरम्यान, शहरातील अवैध धंदे बंद करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) यांनी यापूर्वी पोलीस प्रशासनाला निवेदन दिले होते. २६ जानेवारीपर्यंत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने अवैध धंद्यांविरोधात ठोस पावले उचलली असून, अशी कारवाई यापुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ही कारवाई पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सोपान पाटील यांच्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस कर्मचारी तेजस पारीसकर करीत आहेत.



