चोपडा : प्रतिनिधी
तालुक्यातील उमर्टी येथे एक हृदयद्रावक घटना घडली असून २८ वर्षीय आदिवासी विवाहित महिलेने तिच्या दोन चिमुकल्या मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करीत आहे.
या घटनेत पमिता डोंगरसिंग पावरा (वय २८), अडीच वर्षांचा मुलगा विरेन आणि १५ दिवसांचे बाळ अशा तिघांचा मृत्यू झाला आहे. पमिता पावरा ही तिच्या दोन्ही मुलांसह मंगळवारपासून बेपत्ता होती. बुधवारी सकाळी सुमारे ११ वाजेच्या सुमारास त्यांच्या स्वतःच्या विहिरीत तिघांचे मृतदेह तरंगताना आढळून आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढले. तिघांचे शवविच्छेदन चोपडा उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले. त्यानंतर रात्री शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, पमिता पावरा काही दिवसांपूर्वीच प्रसूत झाली होती. प्रसूतीनंतर ती माहेरी आली होती. त्या काळात तिचा मोठा मुलगा विरेन हा वडिलांकडे होता. दोन ते तीन दिवसांपूर्वीच ती पतीसोबत सासरी परतली होती. मात्र, नेमके कोणत्या कारणामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलले, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. तथापि, कौटुंबिक वादातून ही घटना घडली असावी, अशी चर्चा गावात सुरू आहे. बाळंतपणानंतर अजून काही दिवस माहेरी राहू द्यावे, अशी मागणी असतानाही ती मान्य न झाल्याने मानसिक तणावात तिने हे पाऊल उचलल्याची शक्यता व्यक्त होत आहे. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून घटनेच्या कारणांचा सखोल तपास सुरू आहे.



