जळगाव : प्रतिनिधी
शहरातील इद्रप्रस्थ नगर परिसरात देवदर्शनासाठी बाहेर गेलेल्या कुटुंबाच्या बंद घराला चोरट्यांनी लक्ष्य केल्याची घटना समोर आली आहे. अज्ञात चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ५१ हजार ६२६ रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इद्रप्रस्थ नगर परिसरातील रहिवासी प्रतिभा डिगंबर काळे (वय ४९) या आपल्या कुटुंबासह दि. २७ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजता शेगाव येथे देवदर्शनासाठी गेल्या होत्या. घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील दोन लोखंडी कपाटे उघडून त्यातील १ ग्रॅम वजनाचे आठ सोन्याचे मणी, ३ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, चांदीचे तांबण तसेच २० हजार रुपये रोख रक्कम असा ऐवज लंपास करण्यात आला.
सायंकाळी सुमारे ५ वाजता कुटुंब घरी परतल्यानंतर ही चोरी उघडकीस आली. याप्रकरणी प्रतिभा काळे यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, शहरात बंद घरांना लक्ष्य करून घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे.



