बारामती : वृत्तसंस्था
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. त्यांचे पार्थिव फुलांनी सजवलेल्या रथातून काटेवाडी येथील निवासस्थानाहून बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानाकडे अखेरच्या प्रवासासाठी नेण्यात येत आहे. रथावर अजित पवारांचा हसरा फोटो लावण्यात आला असून, ‘स्वर्गीय अजितदादा पवार अमर रहे’ असे घोषवाक्य झळकत आहे.
अजित पवारांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र आणि राष्ट्रवादी काँग्रेस पोरकी झाल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे. काटेवाडी आणि बारामती परिसरात शोकाकुल वातावरण असून, राज्य मंत्रिमंडळातील सदस्य, विविध पक्षांचे नेते तसेच राज्यभरातील कार्यकर्ते अजित पवारांना अखेरचा निरोप देण्यासाठी दाखल झाले आहेत. प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू आणि मनात अपार दुःख दिसून येत आहे.
शरद पवार आणि प्रतिभाताई पवार यांच्यासाठी हा धक्का अत्यंत वेदनादायक ठरला आहे. प्रतिभाताई पवार यांनी अजित पवारांना नेहमीच मुलाप्रमाणे मानले होते आणि मतभेदांच्या काळातही संवादाचा मार्ग खुला ठेवला होता. शरद पवार हे देखील काटेवाडीसाठी रवाना झाले असून, संपूर्ण पवार कुटुंब या दुःखात एकत्र असल्याचे चित्र आहे. अजित पवारांकडे स्वतःच्या मुलाप्रमाणे पाहणारे शरद पवार पूर्णतः खचून गेल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, अजित पवारांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी काटेवाडी येथे कार्यकर्त्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. काटेवाडीनंतर पार्थिव विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर नेण्यात येणार असून, तेथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडणार आहेत.
कार्यकर्त्यांना शिस्तीचा धडा देणारे, कठोर पण तितकेच संवेदनशील नेतृत्व आज शिस्तबद्ध रांगेत उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांमधून जणू अजूनही अनुभवायला मिळत आहे. अजित पवारांचे निधन ही पवार कुटुंबासाठीच नव्हे, तर महाराष्ट्राच्या राजकारणासाठी एक अपूरणीय हानी मानली जात आहे.



