अमळनेर : प्रतिनिधी
अमळनेर शहरात वाढलेल्या दुचाकी चोरीच्या घटनांचा तपास करताना सीसीटीव्ही फुटेज आणि डम्प डेटाच्या आधारे अमळनेर पोलिसांनी दोन आरोपी निष्पन्न केले आहेत. या कारवाईत धुळे येथील अरबाज शेख साजिद मणियार (वय २८) याला अटक करण्यात आली असून एका अल्पवयीन मुलाला नोटीस देऊन सोडून देण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर शहरात गेल्या काही दिवसांत दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने पोलिसांनी सीसीटीव्ही नेटवर्क अधिक सक्रिय करून फुटेजची बारकाईने तपासणी सुरू केली. तपासादरम्यान एक अल्पवयीन मुलगा व एक तरुण मोटारसायकलवर येताना दिसून आला. त्यानंतर अल्पवयीन मुलगा उतरून दुचाकी चोरताना फुटेजमध्ये स्पष्ट दिसले.
पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शरद काकळीज यांच्यासह हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार, विनोद संदानशिव, निलेश मोरे, चंद्रकांत पाटील, विनोद सोनवणे, गौरव पाटील व मिलिंद जाधव यांच्या पथकाने आरोपींचा शोध सुरू केला. अल्पवयीन मुलाकडे चौकशी केली असता त्याने दोन दुचाकी चोरल्याची कबुली दिली, तर अरबाज शेख याने एक दुचाकी चोरी केल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर पोलिसांनी अरबाज शेख याला अटक केली. आरोपींनी तिन्ही दुचाकी धुळे शहरात लपवून ठेवल्याचे सांगितल्यावर पोलिसांनी सुमारे १ लाख ३० हजार रुपये किमतीच्या तिन्ही मोटारसायकली जप्त केल्या आहेत. आरोपींकडून आणखी काही चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार व हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील करीत आहेत. अमळनेर पोलिसांच्या या कारवाईचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.



