भंडारा : वृत्तसंस्था
भंडारा येथे आयोजित एका सार्वजनिक गायन कार्यक्रमात गायिका अंजली भारती यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. बलात्काराच्या वाढत्या घटनांवर भाष्य करताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल निंदनीय व आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप होत असून, या वक्तव्याचा सर्व स्तरांतून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, विरोधी पक्षातील नेत्यांनीही या विधानाचे समर्थन करता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १३ जानेवारी रोजी भंडाऱ्यात भीम मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अंजली भारती यांच्या गायनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यावेळी बोलताना त्यांनी राज्यात वाढणाऱ्या बलात्काराच्या घटनांवर संताप व्यक्त केला. बलात्काऱ्यांविरोधात कठोर शिक्षा करण्याचे आवाहन करताना त्यांनी अत्यंत आक्रमक आणि वादग्रस्त विधान केले. तसेच, या वक्तव्यादरम्यान त्यांनी मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस यांचे नाव घेत अत्यंत खालच्या पातळीवरील भाषा वापरल्याचा आरोप आहे.
महिलांवरील अत्याचार आणि बलात्कारासारख्या गंभीर विषयावर भाष्य करत असताना, कारण नसताना अमृता फडणवीस यांना लक्ष्य केल्याने या प्रकरणाची तीव्रता वाढली आहे. विशेष म्हणजे, कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्या काही लोकांनी या वक्तव्याला टाळ्या वाजवत प्रतिसाद दिला आणि पैसे उधळल्याचेही समोर आले असून, यामुळे सामाजिक व राजकीय वर्तुळात संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया देत अंजली भारती यांच्या वक्तव्याचे समर्थन करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. राऊत म्हणाले, “मी ते वक्तव्य प्रत्यक्ष ऐकलेले नाही. मात्र, जर कुणी एखाद्या महिलेविषयी, विशेषतः मुख्यमंत्र्यांच्या पत्नीविषयी अशा प्रकारे बोलले असेल, तर त्याचे समर्थन करता येणार नाही. अमृता फडणवीस या स्वतः एक कलाकार असून संगीत क्षेत्रात त्यांचा नावलौकिक आहे. त्यांच्याविषयी अशा प्रकारचे वक्तव्य करणे निषेधार्ह आहे.”
या घटनेनंतर सोशल मीडियावरही तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, अंजली भारती यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे. कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून अशा प्रकारची भाषा वापरणे योग्य आहे का, यावर पुन्हा एकदा सार्वजनिक कार्यक्रमांतील जबाबदारीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.



