चंद्रपूर : वृत्तसंस्था
महानगरपालिकेतील सत्तास्थापनेचा पेच आणि काँग्रेसमधील अंतर्गत कलहावरून भाजप नेते व आमदार परिणय फुके यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “चंद्रपुरात सर्वात मोठा पक्ष ठरूनही सत्ता स्थापन करता न येणे, हे काँग्रेससाठी अत्यंत लाजिरवाणे आहे. सध्या वडेट्टीवारांची अवस्था ‘नाचता येईना अंगण वाकडं’ अशी झाली आहे,” असा खोचक टोला फुकेंनी लगावला.
चंद्रपूर महापालिकेत काँग्रेस सर्वाधिक जागा जिंकूनही सत्तास्थापना करण्यात अपयशी ठरल्याने फुकेंनी काँग्रेसच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “वडेट्टीवार ना स्वतःच्या पक्षश्रेष्ठींचे ऐकतात, ना त्यांचे नगरसेवक त्यांचे ऐकतात. मोठा पक्ष असूनही सत्ता उभी करता न येणे, हे काँग्रेसच्या अपयशाचे प्रतीक आहे,” असे ते म्हणाले.
काँग्रेसवर टीका करताना फुके म्हणाले, “काँग्रेसमधील आपापसातील भांडणांमुळेच जनता त्यांना नाकारत आहे. निवडणूक हरल्यानंतर ईव्हीएम किंवा भाजपवर दोष देण्याची त्यांना सवय झाली आहे. त्यांच्या घरात माशी जरी शिंकली तरी त्याचा दोष भाजपवर टाकला जातो, कारण विरोधकांना आता झोपेतही भाजपच दिसतो.”
चंद्रपूरच्या राजकारणावर भाष्य करताना फुकेंनी ठाम दावा केला की, “चंद्रपुरात शंभर टक्के भाजपचीच सत्ता येईल आणि भाजपचाच महापौर बसणार आहे.” काँग्रेसमध्ये मोठे गट-तट पडले असून, शहराला स्थिर सरकार देण्यासाठी काँग्रेसचा एक गट फुटून भाजपकडे येण्याची शक्यता असल्याचे सूचक संकेतही त्यांनी दिले.
शरद पवार आणि महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत फुकेंनी मोठे भाष्य करत म्हटले की, “शिवसेना (उबाठा) आणि महाविकास आघाडी हे आता बुडते जहाज आहे. शरद पवार हे अत्यंत प्रगल्भ नेते असून, ते अशा बुडत्या जहाजात फार काळ राहतील असे वाटत नाही. भविष्यात ते महायुतीत सहभागी होतील, ही शक्यता नाकारता येत नाही.” शरद पवार यांचा पक्ष एनडीएमध्ये सहभागी होण्याच्या चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले, मात्र याबाबत सध्या कोणतेही ठोस तथ्य नसल्याचेही स्पष्ट केले. चंद्रपूर महापालिकेतील सत्तासंघर्ष आणि या राजकीय वक्तव्यांमुळे जिल्ह्याचे राजकारण चांगलेच तापले असून, पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



