मुंबई : वृत्तसंस्था
बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान याच्या बहुप्रतीक्षित ‘बॅटल ऑफ गलवान’ चित्रपटातील पहिले गाणे ‘मातृभूमी’ नुकतेच प्रदर्शित झाले असून, या गाण्याने प्रेक्षकांच्या मनात देशभक्तीची तीव्र भावना जागृत केली आहे. प्रदर्शित होताच हे गाणे सोशल मीडियावर व्हायरल झाले असून एक्स (ट्विटर)वर ट्रेंडमध्ये आहे.
‘मातृभूमी’ या गाण्यात सलमान खान भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्याच्या भूमिकेत दमदार आर्मी लूकमध्ये दिसत आहे. त्याच्यासोबत अभिनेत्री चित्रांगदा सिंह प्रमुख भूमिकेत असून, गाण्यात एक साधं पण आनंदी कौटुंबिक जीवन दाखवण्यात आलं आहे. शांत, प्रेमळ क्षणांना गलवान खोऱ्यातील तणावपूर्ण युद्धप्रसंगांशी प्रभावीपणे जोडण्यात आले असून कर्तव्य, प्रेम, त्याग आणि देशभक्तीचा भावनिक संगम प्रेक्षकांना अनुभवायला मिळतो.
चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर आता हे पहिले गाणे समोर आल्याने चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिक वाढली आहे. गाण्यातील बोल, पार्श्वसंगीत आणि दृश्यरचना यामुळे कथानकाची भव्यता अधोरेखित होते.
या गाण्याला संगीतकार हिमेश रेशमिया यांनी संगीत दिले असून, अरिजीत सिंग आणि श्रेया घोषाल यांच्या आवाजाने गाण्याला अधिक भावनिक उंची मिळाली आहे. *‘मातृभूमी’*चे बोल समीर अंजन यांनी लिहिले आहेत. सलमान खान फिल्म्सच्या बॅनरखाली सलमा खान यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून, अपूर्व लाखिया यांनी दिग्दर्शन केले आहे.देशभक्तीने भारलेले ‘मातृभूमी’ गाणे सध्या प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत असून *‘बॅटल ऑफ गलवान’*कडून मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत.



