ठाणे : वृत्तसंस्था
ठाणे महापालिका निवडणुकीत AIMIMला मुंब्रा परिसरात मिळालेल्या यशानंतर नव्याने निवडून आलेल्या नगरसेविका सहार शेख यांच्या एका वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या वादावर अखेर पडदा पडला आहे. पोलिस चौकशीनंतर सहार शेख यांनी लेखी माफीनामा दिल्याची माहिती समोर आली असून, माफीनामा स्वीकारल्यानंतर हे प्रकरण मिटल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
निवडणुकीतील विजयानंतर केलेल्या भाषणात सहार शेख यांनी, “अभी हम लोगो को मुंब्रा को पुरा हरा कर देना है,” असे वक्तव्य केले होते. या विधानाचा अर्थ धार्मिक किंवा सामाजिक तेढ निर्माण करणारा असल्याचा आरोप करत भाजप नेते किरीट सोमय्या, आमदार निरंजन डावखरे यांच्यासह बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यांनी मुंब्रा पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या होत्या.
या तक्रारींची दखल घेत मुंब्रा पोलिसांनी सहार शेख यांना नोटीस बजावत चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले. चौकशीनंतर सहार शेख यांनी दिलेल्या लेखी माफीनाम्यात ‘हरा’ हा शब्द पक्षाचा झेंडा आणि निवडणूक चिन्हाच्या संदर्भात वापरण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. “माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी जाहीर व लेखी माफी मागते,” असे त्यांनी माफीनाम्यात नमूद केले आहे.
दरम्यान, या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांची भेट घेतली. चौकशी पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी तक्रारदारांना नगरसेविकेने माफीनामा दिल्याची माहिती दिली.
पोलिसांनी माफीनामा स्वीकारत प्रकरण संपुष्टात आणले असले, तरी भविष्यात अशा प्रकारची विधानं किंवा सामाजिक वातावरण बिघडवणारी कृती झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला आहे.
मुंब्रा परिसरातून AIMIMचे पाच नगरसेवक निवडून आल्याने राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली होती. त्याच पार्श्वभूमीवर सहार शेख यांच्या विजय भाषणातील वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता आणि सोशल मीडियावरही या वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यात आला होता.



