मुंबई : वृत्तसंस्था
२२ जानेवारी रोजी मुंबईत झालेल्या आरक्षण सोडतीत मुंबई महानगरपालिकेचे महापौरपद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून महापौर बसवण्यासाठी जोरदार हालचाली सुरू असून अनेक नावांची चर्चा रंगू लागली आहे. तर उपमहापौरपद शिंदेसेनेला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या राजकीय घडामोडींमध्ये आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी एक मोठे आणि खळबळजनक विधान केले आहे.
“एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पाठिंबा द्यावा आणि मुंबईत शिवसेनेचा महापौर बसवावा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षी हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल,” असे आवाहन भास्कर जाधव यांनी केले. त्यांच्या या विधानामुळे मुंबईच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भास्कर जाधव यांनी आपल्या भूमिकेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधत दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात, अशी भावनिक साद त्यांनी घातली आहे.
“हे बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि याच वर्षी मुंबई महापालिकेत बाळासाहेबांच्या शिवसेनेचा महापौर बसणार नाही, यासारखे दुःख दुसरे नाही. जे स्वतःला बाळासाहेबांचे वारसदार म्हणवतात, जे बाळासाहेबांचे विचार पुढे नेत असल्याचा दावा करतात, त्यांना मी कळकळीची विनंती करतो. इथेच तुमची बाळासाहेबांवर खरी श्रद्धा आहे का, हे सिद्ध करण्याची वेळ आहे,” असे भावनिक वक्तव्य जाधव यांनी केले.
जर खरोखरच बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली अर्पण करायची असेल, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पाठिंबा दिला पाहिजे, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेनेतील सत्तासंघर्ष, मुंबई महापालिकेतील महापौरपद आणि आगामी राजकीय समीकरणांवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.



