जळगाव : प्रतिनिधी
गरजूंची सेवा करणे हेच खरे आमचे व्रत आहे. शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यसेवा पोहोचलीच पाहिजे, यासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील असते. आज या नेत्र तपासणी ॲम्बुलन्सच्या माध्यमातून गरिबांच्या दारात आरोग्य सेवा पोहोचत आहे. जोपर्यंत समाजातील शेवटचा माणूस आरोग्य संपन्न होत नाही, तोपर्यंत ही सेवा अखंड सुरू राहणार असल्याचे प्रतिपादन पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या २३ जानेवारी या जयंतीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जीपीएस मित्र परिवाराच्या अत्याधुनिक फिरते नेत्र तपासणी ॲम्बुलन्सचे लोकार्पण तसेच पाळधी गावातील विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले .या प्रसंगी शिवसेना प्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
पालकमंत्री श्री पाटील यावेळी म्हणाले,आतापर्यंत रुग्णांना तपासणीसाठी पाळधी येथे यावे लागत होते. मात्र ग्रामीण भागातील वृद्ध व गरजू रुग्णांची गैरसोय लक्षात घेऊन आता ही अत्याधुनिक ॲम्बुलन्स थेट गावोगावी जाऊन तपासणी करणार आहे. तपासणी नंतर आवश्यक रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी पुढील उपचारासाठी पाठवले जाणार असून, ही ॲम्बुलन्स सर्वसामान्यांसाठी खऱ्या अर्थाने ‘मायेची दृष्टी’ ठरणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
पाळधी व परिसरात जी विविध विकासकामे पूर्ण झाली आहेत त्यामुळे या परिसराचा काया पालट झाला आहे या कामांमुळे विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील व विक्रम पाटील यांच्या पुढाकारातून जीपीएस ग्रुपने आतापर्यंत
३३ मोफत नेत्र तपासणी शिबिरे,
२९,२६० रुग्णांची तपासणी,
१०,९४० मोतिबिंदू शस्त्रक्रिया
यशस्वीरीत्या पूर्ण केले आहेत. या वेळी उपस्थित ग्रामस्थांनी “पालकमंत्री गुलाबराव पाटील हे आमच्यासाठी खरे अर्थाने ‘दृष्टीदाता’ आहेत,” अशा भावना व्यक्त केल्या.
परिसरातील विविध विकासकामांचे लोकार्पण
पाळधी खुर्द,पोखरी, पोखरी तांडा, पाळधी बु.
पोखरी–वराड रस्त्याचे डांबरीकरण, गावांतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण, मराठी व उर्दू शाळांसाठी नव्या खोल्या बांधकाम, पाळधी खुर्द येथे संविधान भवन, ठीक ठिकाणी ब्लॉक बसविणे, अल्पसंख्याक समाजासाठी शादीखाना हॉल, एलईडी पथदिव्यांचे लोकार्पण
अशा विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जि.प. सदस्य प्रतापराव पाटील म्हणाले, जीपीएस ग्रुपमार्फत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक, आरोग्य व शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. जनतेच्या विश्वासामुळेच हे सेवायज्ञ अखंड सुरू आहे. जीपीएस ग्रुपचे सदस्य प्रशांत झंवर यांनी सूत्रसंचालन केले. आभार जीपीएस स्कूल कॅम्पचे चेअरमन विक्रम पाटील यांनी मानले.
कार्यक्रमाला पाळधी बु. सरपंच विजय पाटील, पाळधी खु. सरपंच लक्ष्मीबाई शरद कोळी, उपसरपंच निसार शेख,
लोकप्रतिनिधी,जीपीएस मित्र परिवाराचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



