मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक छोट्या मोठ्या शहरात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटना घडत असताना आता बदलापूर पश्चिम परिसरातून माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. शाळेतून घरी परतणाऱ्या एका अवघ्या चार वर्षांच्या निष्पाप चिमुकलीवर स्कूल व्हॅनच्या चालकानेच लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. काही महिन्यांपूर्वी घडलेल्या अशाच एका घटनेच्या जखमा ताज्या असतानाच, या नवीन प्रकरणाने संपूर्ण बदलापूर शहर पुन्हा एकदा हादरले असून पालकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
पीडित चिमुकली नेहमीप्रमाणे शाळे सुटल्यानंतर स्कूल व्हॅनने घरी परतत होती. याच प्रवासादरम्यान नराधम चालकाने तिला आपल्या पाशवी वासनेचे शिकार बनवले. घरी पोहोचल्यानंतर या घाबरलेल्या चिमुकलीने घडलेला सर्व प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला. नराधम आरोपीने केवळ अत्याचारच केला नाही, तर तिला मारहाण करून कोणालाही न सांगण्याची धमकीही दिली होती. मुलीने सांगितलेली हकीकत ऐकून पालकांना मोठा धक्का बसला.
या घटनेची माहिती मिळताच संतप्त पालकांनी तातडीने बदलापूर पश्चिम पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने कारवाई करत आरोपी व्हॅन चालकाला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. शाळेत जाणाऱ्या चिमुकल्यांच्या सुरक्षेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
बदलापुरातील या ताज्या घटनेचे पडसाद शहरात उमटू लागले असून राजकीय आणि सामाजिक वातावरण कमालीचे तापले आहे. या प्रकरणातील संताप व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या संगीता चेंदवणकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह संबंधित स्कूल व्हॅनची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. चिमुकल्यांच्या सुरक्षेबाबत वारंवार घडणाऱ्या या गंभीर प्रकारांमुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविरुद्ध प्रचंड रोष असून, शहरात पुन्हा एकदा आंदोलनाची ठिणगी पडण्याची चिन्हे दिसत आहेत.



