नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यातील भादरवाह भागात गुरुवारी भारतीय लष्कराच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. उंचावरील पोस्टकडे जात असलेली भारतीय सैन्याची बुलेटप्रूफ गाडी सुमारे 200 फूट खोल दरीत कोसळल्याने 10 जवान शहीद झाले, तर अनेक जवान गंभीर जखमी झाले आहेत.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या वाहनामध्ये एकूण 17 जवान प्रवास करत होते. भादरवाह परिसरातील अरुंद व वळणदार रस्त्यावरून जात असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि वाहन खोल दरीत कोसळले.
अपघाताची माहिती मिळताच लष्कर व पोलिसांच्या पथकाने तातडीने मदत व बचाव कार्य सुरू केले. दुर्गम परिसर असूनही स्थानिक नागरिकांनी देखील रेस्क्यू टीमला मोलाची मदत केली. दीर्घकाळ चाललेल्या बचाव कार्यादरम्यान 10 जवानांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले, तर जखमी जवानांना सुरक्षितपणे दरीतून बाहेर काढण्यात आले.
जखमी जवानांची प्रकृती गंभीर असून त्यांना हेलिकॉप्टरद्वारे उधमपूर येथील कमांड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे त्यांच्यावर विशेष उपचार सुरू असल्याची माहिती लष्कराकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, भारतीय लष्कराने या अपघाताची चौकशी सुरू केली असून जखमी जवानांना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा देण्यात येत आहेत. या दुर्घटनेत शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली असून संपूर्ण देशभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.



