अमरावती : वृत्तसंस्था
जिल्ह्यातील अचलपूर नगरपालिकेत भाजप आणि एमआयएम यांच्यात युती झाल्याच्या चर्चांमुळे राजकीय वातावरण तापले असतानाच भाजपकडून या चर्चांचे ठाम शब्दांत खंडन करण्यात आले आहे. भाजपचे नेते अभय माथने यांनी भाजप–एमआयएम युती असल्याची माहिती पूर्णपणे चुकीची असल्याचे स्पष्ट केले.
अचलपूर नगरपालिकेतील शिक्षण व क्रीडा समितीच्या सभापतीपदी एमआयएमच्या नगरसेवकाची निवड झाल्यानंतर भाजप आणि एमआयएम एकत्र आल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, यासंदर्भात अभय माथने यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, अचलपूरमध्ये भाजपकडून उमेदवार निवडीत चूक झाल्यामुळे अपेक्षित यश मिळाले नाही. एमआयएमच्या उमेदवाराची सभापतीपदी निवड झाली असली, तरी भाजप आणि एमआयएम यांच्यात कोणतीही युती झालेली नाही.
ते पुढे म्हणाले की, काँग्रेसच्या उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे ही निवड सहमतीने पार पडली आहे. येथे कोणतीही थेट निवडणूक झाली नसून, सहमती प्रक्रियेतून सभापतीची निवड करण्यात आली. त्यामुळे एमआयएमचा सभापती झाला, याचा अर्थ भाजपने त्यांना पाठिंबा दिला, असा काढू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नगरपालिकेतील संख्याबळाचा उल्लेख करताना माथने म्हणाले की, अचलपूर नगरपालिकेत भाजपचे 9 नगरसेवक आहेत, तर काँग्रेसचे 17 नगरसेवक निवडून आले आहेत. अशा परिस्थितीत भाजपकडे निर्णय लादण्याइतके संख्याबळ नाही. त्यामुळे भाजप–एमआयएम युती असल्याचे जे चित्र रंगवले जात आहे, ते वस्तुस्थितीला धरून नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.



