जळगाव : प्रतिनिधी
प्रभाग क्रमांक ३ ब मध्ये अपक्ष उमेदवार चैताली राहुल ठाकरे यांनी आयोजित केलेल्या कॉर्नर सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या सभेदरम्यान त्यांनी थेट नागरिकांशी संवाद साधत परिसरातील विविध समस्या जाणून घेतल्या.
पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, तसेच मूलभूत नागरी सुविधांबाबत नागरिकांनी मोकळेपणाने आपली मते मांडली.
चैताली राहुल ठाकरे यांनी आपल्या भाषणात प्रभागातील तरुणांसाठी विविध विकासात्मक उपक्रम राबवण्याचे, तसेच महिलांना बचत गटांच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे स्पष्ट आश्वासन दिले. यासोबतच प्रभागातील विविध ठिकाणी गार्डन, ओपन जिम, तसेच नागरिकांसाठी विरंगुळ्याच्या सुविधा उभारण्यावर विशेष भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मागील पंचवार्षिक निवडणुकीत अपयश आले असले तरी यावेळी नागरिकांमध्ये मोठी भावनिक साद दिसून येत आहे. “यावेळी नागरिकांनी मतदानरूपी आशीर्वाद देऊन मला संधी दिल्यास, तुमच्या सर्व समस्या शंभर टक्के सोडवण्याची जबाबदारी मी पूर्ण ताकदीने पार पाडेन,” असे ठाम आश्वासन त्यांनी उपस्थितांना दिले.
यावेळी ‘मोगली बाबा’ म्हणून ओळखले जाणारे राहुल ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, “एकीकडे धनशक्ती आहे, तर दुसरीकडे जनशक्ती. आम्ही अपक्ष उमेदवार आहोत आणि गेल्या अनेक वर्षांपासून प्रभागात केलेल्या कामाचीच ही पावती आहे. आज या कॉर्नर सभेला मिळालेली उपस्थिती ही निश्चितच विजयाची नांदी ठरेल. त्यांनी पुढे स्पष्ट केले की, धनशक्तीविरुद्ध जनशक्तीच विजयी ठरेल, असा विश्वास त्यांना नागरिकांच्या पाठिंब्यावरून वाटत आहे.
या कॉर्नर सभेला प्रभागातील तरुण, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. नागरिकांचा वाढता उत्साह आणि सहभाग पाहता, प्रभाग ३ मधील निवडणूक लढत अधिकच चुरशीची होत असल्याचे चित्र स्पष्ट दिसून आले.



