भुसावळ : प्रतिनिधी
जुना सातारा परिसरातील हंबर्डीकर चाळ येथे मंगळवारी रात्री सुमारे ११ वाजेच्या सुमारास किरकोळ वादाचे रूपांतर गंभीर घटनेत झाले. गावठी कट्ट्यातून हवेत गोळीबार करण्यात आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले. या प्रकरणी भुसावळ शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी दोघे अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी सांगितले.
संदीप मनोहर कोळेकर (रा. हंबर्डीकर चाळ) यांचा चंद्रकांत उर्फ बाबा विनोद बेंगट व त्याच्या मित्रांसोबत हॉटेलमध्ये जेवण करताना वाद झाला होता. या वादाची कुरापत काढत बाबा बेंगट, कुंदन अनिल पठाडे व अन्य दोघांनी संदीप कोळेकर यांच्या परिसरात येऊन गोंधळ घातला. यावेळी चौघांपैकी एकाने गावठी बंदुकीतून हवेत गोळीबार केला. तसेच मुकेश सुरेश भोई या तरुणास बेदम मारहाण करण्यात आली.
मारहाणीत मुकेश भोई यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संदीप कोळेकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घटनास्थळावरून एक रिकामी पुंगळी व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.
पोलिसांनी तपासाला वेग देत चौघांना ताब्यात घेऊन अटक केली. यातील चंद्रकांत उर्फ बाबा विनोद बेंगट व कुंदन अनिल पठाडे यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना दि. २ जानेवारीपर्यंत तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. उर्वरित दोन अल्पवयीन आरोपींबाबत कायद्यानुसार स्वतंत्र कारवाई सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.



