छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी छत्रपती संभाजीनगर भाजपमध्ये बंडखोरीचा उद्रेक झाला. अनेक वर्षांपासून पक्षासाठी झटणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याचा आरोप करत संतप्त कार्यकर्त्यांनी थेट रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन केले. दुपारी भाजपच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयासमोर शेकडो कार्यकर्त्यांनी आक्रमक निदर्शने करत परिस्थिती चिघळवली.
या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्या वाहनाला काळं फासून निषेध नोंदवला, तर डॉ. भागवत कराड यांची गाडी आंदोलकांनी रोखून धरली. संतप्त कार्यकर्त्यांचा रोष इतका तीव्र होता की, दोन्ही नेत्यांना पोलिसांच्या कडक बंदोबस्तात तेथून बाहेर काढावे लागले.
आंदोलनादरम्यान एक धक्कादायक प्रकार घडला. उमेदवारी न मिळाल्याने संतप्त झालेल्या एका कार्यकर्त्याने थेट अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. “आम्ही रात्रंदिवस पक्षासाठी काम केले, मात्र नेत्यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला,” असा आक्रोश करत त्याने टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला.
कार्यकर्त्यांनी नेत्यांवर गंभीर आरोपांची झोड उठवली. अतुल सावे यांनी स्वतःच्या पीए आणि नातेवाईकांना उमेदवारी दिल्याचा आरोप करण्यात आला. महिला कार्यकर्त्यांनी “नेत्यांच्या घरी येणाऱ्या-जाणाऱ्यांसाठी आम्ही लाखो रुपये खर्च केले, मात्र शेवटपर्यंत उमेदवारीचा लॉलीपॉप दाखवून आमची फसवणूक केली,” असा संताप व्यक्त केला.
तर डॉ. भागवत कराड यांनी केवळ विशिष्ट समाजाला झुकते माप देत इतर निष्ठावंतांचा बळी घेतल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. “मी सर्वेक्षणात आघाडीवर होतो, मग माझे तिकीट कापून पीएला का दिले? जर मी सर्वेक्षणात मागे असेन, तर आयुष्यभर गुलामी करायला तयार आहे,” असे खुले आव्हान भदाने पाटील या कार्यकर्त्याने दिले. संतप्त कार्यकर्त्यांनी सावे व कराड यांच्या फोटोंची होळी करत ती कचऱ्यात फेकली. ‘भाजप कोणाच्या बापाचा पक्ष नाही’, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. दरम्यान, उमेदवारी नाकारल्याने व्यथित झालेल्या सुवर्णा मराठे यांनी कडाक्याच्या थंडीत प्रचार कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.



