यावल : प्रतिनिधी
यावल शहरात भुसावळकडून येणाऱ्या रस्त्यावर भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने रस्ता ओलांडणाऱ्या एका वृद्धाला जबर धडक दिल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातात वृद्ध गंभीर जखमी झाले असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, प्रेमसिंग मोतीलाल सिसोदिया हा तरुण कंटेनर (एम.एच. ४० सी.एम. १४४२) घेऊन भुसावळकडून यावलच्या दिशेने येत होता. यावेळी साने गुरुजी शाळेजवळ रस्ता ओलांडत असलेले दत्तात्रय पांडुरंग जाधव (वय ६९, रा. साने गुरुजी शाळेजवळ, यावल) यांना कंटेनरने जोरदार धडक दिली. या धडकेत त्यांच्या डोक्याला, हाताला व पायाला गंभीर दुखापती झाल्या आणि ते जागीच ठार झाले.
अपघातानंतर जखमी अवस्थेत दत्तात्रय जाधव यांना तातडीने यावल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या अपघात प्रकरणी योगेश चव्हाण यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात कंटेनर चालक प्रेमसिंग सिसोदिया याच्याविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन करीत आहेत.



