नागपूर : वृत्तसंस्था
बंगळुरूमध्ये नवविवाहित पत्नीच्या आत्महत्येनंतर निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागपुरात हृदयद्रावक घटना घडली. वर्धा रोडवरील हॉटेल रॉयल वीला येथे आई आणि मुलाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत मुलगा सुरज याचा मृत्यू झाला असून, आई जयंती यांची प्रकृती अत्यवस्थ आहे.
जयंती आणि सुरज हे दोघेही मूळचे बंगळुरू येथील रहिवासी आहेत. सुरजचे २६ वर्षीय गानवी उर्फ राशी हिच्याशी २९ ऑक्टोबर २०२५ रोजी लग्न झाले होते. सुरज बंगळुरू येथील बेल लेआऊट, विद्यारण्यपुरा येथे वास्तव्यास होता, तर गानवी राममूर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बी. चन्नासंद्रा येथे आपल्या कुटुंबासोबत राहत होती.
मिळालेल्या माहितीनुसार, गानवी हिने बुधवारी (दि. २४) रात्री बंगळुरूमध्ये तिच्या आई-वडिलांच्या घरी गळफास घेतला. तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र गुरुवारी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. गानवीच्या मृत्यूनंतर तिच्या नातेवाईकांनी ४० लाख रुपयांच्या हुंड्यासाठी छळ झाल्याचा आरोप करत बंगळुरू येथील स्थानिक पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केले होते.
गानवीच्या कुटुंबीयांच्या आरोपानुसार, लग्नानंतर लगेचच सुरज आणि त्याच्या कुटुंबीयांकडून लग्नाच्या स्वागत समारंभासाठी ४० लाख रुपयांची मागणी करून तिचा छळ करण्यात आला. श्रीलंकेतील हनिमूनदरम्यानही हा छळ सुरूच असल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. यामुळे गानवीने हनिमून अर्धवट सोडून माहेरी परत येण्याचा निर्णय घेतला होता.
दरम्यान, गानवीच्या मृत्यूनंतर बंगळुरूमध्ये आंदोलन आणि पोलिसी हालचाली सुरू असतानाच जयंती आणि सुरज नागपुरात आले होते. वर्धा रोडवरील हॉटेल रॉयल वीला येथे त्यांनी मुक्काम केला होता. याच ठिकाणी दोघांनीही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात सुरजचा मृत्यू झाला, तर जयंती यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शवविच्छेदनानंतर गानवीच्या कुटुंबीयांनी तिचा मृतदेह सुरजच्या विद्यारण्यपुरा येथील घरासमोर नेऊन आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करत निदर्शने केली होती. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी विद्यारण्यपुरा पोलिसांनी हस्तक्षेप करत कायदेशीर कारवाईचे आश्वासन दिले आहे. या दुहेरी शोकांतिकेमुळे नागपूर आणि बंगळुरू दोन्ही ठिकाणी खळबळ उडाली असून, संबंधित प्रकरणांचा पोलीस सखोल तपास करत आहेत.



