ठाणे : वृत्तसंस्था
भाजपने एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाण्यात आक्रमक प्रचाराला सुरुवात केली असून, यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी थेट एकनाथ शिंदेंना लक्ष्य करत खोचक टिप्पणी केली. “एकनाथ शिंदेंच्या मागे सध्या राहू दोष किंवा शनी दोष आहे का, याची खात्री त्यांनी एखाद्या ज्योतिषाकडे जाऊन करून घेतली पाहिजे,” असा चिमटा वडेट्टीवारांनी काढला.
नागपुरात पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, “राहू, केतू यांसारखे ग्रह त्यांना शांतपणे जगू देतील का, त्यांच्या मागे काही अडचणी आहेत का, अशी शंका सध्या निर्माण होत आहे.” भाजपकडून ठाण्यात ‘नमो भारत, नमो ठाणे’ असा प्रचार सुरू असल्यावर त्यांनी उपरोधिक भाष्य करत, “कुणी नमो म्हणो, कुणी सुमो म्हणो, कुणी रमो म्हणो. हा त्यांचा प्रश्न आहे,” असे सांगितले.
यावेळी वडेट्टीवारांनी वंचित बहुजन आघाडीसोबतच्या मुंबईतील जागावाटपाच्या चर्चांवरही भाष्य केले. वंचित बहुजन आघाडीने मुंबईत काँग्रेसकडे ६० जागांची मागणी केल्याची चर्चा असल्यावर ते म्हणाले, “वंचितने नेमक्या कोणत्या जागांवर दावा केला आहे, याची मला माहिती नाही. मुंबईतील नेत्यांशी चर्चा झाल्यानंतरच याबाबत स्पष्ट चित्र समोर येईल. उमेदवारी दाखल करण्यास अजून दोन दिवस आहेत. कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन योग्य निर्णय घेतला जाईल.” दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट एकत्र निवडणूक लढवण्याच्या चर्चांबाबत विचारले.
दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट एकत्र निवडणूक लढवण्याच्या चर्चांबाबत विचारले असता, वडेट्टीवार म्हणाले, “दुसऱ्याच्या घरात काय चालले आहे, ते पाहण्याचा मला अधिकार नाही. मात्र त्यांच्या चर्चा बऱ्याच पुढे गेल्या आहेत, असे ऐकायला मिळते. घड्याळावर लढायचे की तुतारीवर, यावरच वाद सुरू आहेत.”
राज्यातील सध्याच्या राजकीय स्थितीवर टीका करताना त्यांनी म्हटले, “वाटेल त्या पद्धतीच्या आघाड्या आणि युती होत आहेत. राजकारणाचा चिखल झाला असून, त्या चिखलात सर्वांच्या अंगावर डाग पडत आहेत. इतक्या खालच्या पातळीचे राजकारण महाराष्ट्रात यापूर्वी कधीही पाहायला मिळाले नाही.”



