जळगाव : प्रतिनिधी
जळगाव तालुक्यातील चिचोली गावात एका ४० वर्षीय तरुणाने पाण्याच्या टाकीजवळ गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि. २५ डिसेंबर) सकाळी ११ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नाना अशोक पाटील (वय ४०, रा. चिंचोली, ता. जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. नाना पाटील हे आपल्या कुटुंबासह चिंचोली गावात वास्तव्यास होते. गुरुवारी सकाळी गावातील पाण्याच्या टाकीजवळ त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.
ही घटना गावातील सागर नाळकर व इतर ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने नाना पाटील यांना खाली उतरवून जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. या घटनेची नोंद एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस कर्मचारी गफुर तडवी करीत आहेत. या घटनेमुळे चिंचोली गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.



