पुणे : वृत्तसंस्था
पुण्याचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातील खंबीर नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे माजी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आज मुंबईतील टिळक भवन येथे जाहीरपणे काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी प्रशांत जगताप यांचे स्वागत करताना त्यांना गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता’ हे पुस्तक देण्यात आले.
पक्षप्रवेशानंतर बोलताना प्रशांत जगताप भावनिक झाले. “मी तब्बल २६ वर्षे शरद पवार यांच्या विचारांशी एकनिष्ठ राहिलो. मात्र, सध्याची लढाई ही भाजप आणि संघ विचारधारेविरोधातील आहे. भाजपला खऱ्या अर्थाने टक्कर देण्याची ताकद केवळ काँग्रेसमध्येच आहे. मी राजकारणातून बाहेर पडेन्, पण काँग्रेस सोडून कुठेही जाणार नाही,” असे स्पष्ट शब्दांत त्यांनी सांगितले.
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाकडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. भाजपला पाठिंबा देणाऱ्या पक्षासोबत युती करणे आपल्याला मान्य नसल्याचे जगताप यांनी यावेळी स्पष्ट केले. “ज्यांनी भाजपची साथ दिली, त्यांच्यासोबत मी कधीही जाणार नाही,” असे सांगत त्यांनी पुरोगामी विचारांची काँग्रेस निवडल्याचे स्पष्ट केले.
प्रशांत जगताप यांच्या प्रवेशामुळे पुणे शहरात काँग्रेस पक्षाला मोठे बळ मिळाले आहे. विशेषतः हडपसर विधानसभा मतदारसंघात त्यांची मजबूत पकड असून, आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेसला त्याचा थेट फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे, शरद पवार गटासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात असून, पुण्यातील एक आक्रमक, अभ्यासू आणि प्रभावी नेतृत्व गमावल्याने राष्ट्रवादीची ताकद कमी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.



