मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीच्या चर्चांमुळे राजकीय वातावरण तापले असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या युतीवर जोरदार आणि आक्रमक शब्दांत टीका केली आहे. ठाकरे बंधूंचे सध्याचे राजकारण हे केवळ मतांसाठी केले जाणारे लांगुलचालन असून, त्यातून त्यांच्या विचारधारेची घसरण स्पष्टपणे दिसून येत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.
फडणवीस म्हणाले की, काही विशिष्ट घटकांची मर्जी राखण्यासाठी आणि मतांचे राजकारण साधण्यासाठी जे निर्णय घेतले जात आहेत, त्यातून संबंधित नेत्यांची दिशा, विचार आणि चारित्र्य जनतेसमोर उघड होत आहे. शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख करत त्यांनी त्यांच्या सुपुत्रांकडून घेतल्या जात असलेल्या निर्णयांवरही गंभीर प्रश्न उपस्थित केले.
छत्रपती संभाजीनगरमध्ये रशिद खान मामू यांना पक्षात प्रवेश देण्यात आल्याचा संदर्भ देत फडणवीस यांनी हा निर्णय केवळ मतांचे लांगुलचालन करण्यासाठीच असल्याचा आरोप केला. अशा व्यक्तीविशेषांना पक्षात सामावून घेणे म्हणजे विचारधारेचा त्याग असून, यामुळे नेतृत्वाची वैचारिक अधोगती स्पष्ट होते, असे त्यांनी नमूद केले.
टीका अधिक तीव्र करताना फडणवीस म्हणाले की, सत्तेसाठी काही लोकांचे “जोडे चाटण्यापर्यंत” जाणे ही महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारी बाब नाही. मात्र, अशा राजकारणाला जनता भुलणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रनिष्ठ, विचारांशी प्रामाणिक नागरिक हे सर्व बारकाईने पाहत असून, या प्रकारच्या राजकारणाची किंमत संबंधितांना मोजावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
महायुतीबाबत भूमिका स्पष्ट करताना फडणवीस म्हणाले की, महायुतीची घोषणा करण्याची आम्हाला कोणतीही घाई नाही. आम्ही आधीपासूनच एकत्र आहोत आणि आमच्यात कोणताही संभ्रम नाही. आमची एकजूट घोषणांतून नव्हे, तर कृतीतून दिसते, असे ते म्हणाले. विरोधकांकडील घोषणा या केवळ संभ्रम निर्माण करण्यासाठी असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
यावेळी आंतरराष्ट्रीय राजकारणाचे उदाहरण देत फडणवीस यांनी उपरोधिक टिप्पणी केली. “पुतीन आणि झेलेन्स्की एकत्र येणार असतील, तरच घोषणा करावी लागते,” असे म्हणत त्यांनी ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. घोषणा केल्या असल्या तरी प्रत्यक्षात त्यांच्यात नेमके काय सुरू आहे, हे कुणालाच कळत नाही, असा टोमणाही त्यांनी मारला. महायुती योग्य वेळी योग्य पद्धतीने आपली भूमिका जाहीर करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.



