नाशिक : वृत्तसंस्था
“मी गेल्या ४० वर्षांपासून पक्षाची निष्ठावान कार्यकर्ती आहे. स्वतःसाठी कधीही जाहीर भूमिका घेतली नाही. मात्र माझ्या डोळ्यांसमोर सामान्य कार्यकर्त्यांचा बळी दिला जात असेल, तर ते मी सहन करू शकत नाही,” अशा शब्दांत नाशिक भाजपच्या महापालिका निवडणूक प्रमुख आणि आमदार देवयानी फरांदे यांनी आपली खंत व्यक्त केली. नाशिकमध्ये झालेल्या बड्या पक्षप्रवेशांनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्या कमालीच्या भावूक झाल्या असून, त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते.
नाशिकमध्ये भाजपने आज विरोधी पक्षांतील अनेक बड्या नेत्यांचे पक्षप्रवेश करून ‘इनकमिंग’चा धडाका लावला. मात्र, या पक्षप्रवेशांमुळे भाजपमधील अंतर्गत कलह उघडपणे समोर आला आहे. विशेषतः माजी महापौर यतीन वाघ यांच्या प्रवेशाला आमदार देवयानी फरांदे यांचा कडाडून विरोध होता. तरीही त्यांच्या मताला डावलून पक्षप्रवेश पार पडल्याने फरांदे या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्या.
यानंतर माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट करताना देवयानी फरांदे म्हणाल्या की, “मी कुणाच्या पक्षप्रवेशाला विरोध करत नाही. मात्र लोकप्रतिनिधी म्हणून माझे मत असे होते की, त्या मतदारसंघात सक्षम उमेदवार बबलू शेलार यांचा प्रवेश झाला होता. बाहेरून आलेला एक उमेदवार आणि त्यांच्यासोबत आमचे तीन स्थानिक उमेदवार घेऊन पॅनल तयार केले असते, तर ते शंभर टक्के निवडून आले असते.” कार्यकर्ते वर्षानुवर्ष पक्षासाठी काम करतात आणि जिथे विजयाची संधी स्पष्ट दिसत होती, तिथे त्यांच्या भावनांचा विचार व्हायला हवा होता, असेही त्यांनी सांगितले.
“गेल्या ४० वर्षांत मी स्वतःसाठी कधीही भूमिका घेतली नाही आणि पुढेही घेणार नाही. मी पक्षाची निष्ठावान कार्यकर्ती आहे. पण सर्वांनाच नेते व्हायचे आणि आपापलेच पाहायचे असतील, तर पक्षासाठी झटणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पाठबळ कुणी द्यायचे?” असा सवाल उपस्थित करत, याच भावनेतून आपण सोशल मीडियावर पोस्ट केल्याचे फरांदे यांनी स्पष्ट केले.
माध्यमांशी बोलताना त्या गहिवरून गेल्या. “मी एक सामान्य कार्यकर्ती आहे. माझ्या डोळ्यांसमोर कार्यकर्त्यांचा बळी जात असेल, तर ते मला योग्य वाटत नाही,” असे सांगताना त्यांच्या डोळ्यांत पाणी आले. “आज जे पक्षात आले आहेत, त्यांचे मी पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांप्रमाणे स्वागत करते. मात्र आज जे घडले, ते मला आवडलेले नाही,” असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “मला कुणी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला, तरी मी घाबरणार नाही.” तसेच या प्रकरणात पक्षाच्या जुन्या नेत्यांनी आपल्या भूमिकेला पाठिंबा दिला असता, तर कार्यकर्त्यांना वेगळाच संदेश गेला असता, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
गिरीश महाजन यांच्याबाबत बोलताना फरांदे म्हणाल्या, “मी त्यांच्यावर अजिबात नाराज नाही. त्यांना चुकीच्या पद्धतीने ब्रीफ करण्यात आले. काही दलाल आणि स्वार्थी लोकांनी आपल्याच घरात तिकीट मिळावे या उद्देशाने हे सगळे राजकारण घडवले आहे.” मात्र यापुढे या विषयावर अधिक बोलणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या भावनिक वक्तव्यामुळे नाशिक भाजपमधील अंतर्गत अस्वस्थता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली असून, आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी पक्षातील घडामोडींना वेग येण्याची चिन्हे दिसत आहेत.



