वरणगाव : प्रतिनिधी
कच (खडी) घेण्यासाठी जाणारे ट्रॅक्टर उलटून त्याखाली दबून पिता आणि सात वर्षीय बालक ठार झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना बुधवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास वरणगाव-किन्ही (ता. भुसावळ) रस्त्यावर घडली. यात एक जण जखमी झाला आहे. संजय श्रवण साबळे (४८) आणि भूषण संजय साबळे (७ वर्षे, रा. सिद्धेश्वरनगर, वरणगाव) अशी मृतांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, वरणगाव शहरातील सिद्धेश्वरनगरमधील मोलमजुरी करणारे संजय साबळे आणि अक्षय संतोष मोरे (२७) सकाळी खडी आणि कच घेण्यासाठी ट्रॅक्टरने किन्ही, ता. भुसावळकडे जात होते. संजय यांच्यासोबत त्यांचा सात वर्षांचा मुलगाही होता. किन्ही गावाजवळ ट्रॅक्टर अचानक उलटले. त्याखाली संजय साबळे आणि भूषण साबळे हे दबले गेले. त्यातच त्यांचा करुण अंत झाला. या अपघातात अक्षय संतोष मोरे (२७) हा गंभीर जखमी झाला. वरणगाव ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्याला जळगाव येथील सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. पिता-पुत्रांचे मृतदेह वरणगाव ग्रामीण रुग्णालयात आणले असता नातेवाइकांनी रुग्णालयात आक्रोश केला. याप्रकरणी वरणगाव पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
संजय साबळे यांच्या घरची स्थिती अतिशय नाजूक आहे. घरातील कर्ता पुरुष व मुलगा गेल्याने त्याच्या पत्नीसह परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेने वरणगावर निःशब्द झाले आहेत. पिता-पुत्राची अंत्ययात्रा गुरुवारी सकाळी ८ वाजता सिद्धेश्वरनगरमधील वीर लहुजी साळवेनगर येथून निघणार आहे. सकाळी अपघाताची माहिती मिळताच लहूजी साळवे वस्ताद नगरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. वरणगावचे नगराध्यक्ष सुनील काळे यांनी तहसीलदार तसेच वरिष्ठांशी संपर्क साधून अपघाताची माहिती दिली आणि शक्य तितकी जास्तीत जास्त शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.



