नवी दिल्ली : वृत्तसंस्था
ईशान्य भारतातील आसाम राज्याच्या कार्बी आंगलोंग जिल्ह्यात पुन्हा एकदा हिंसाचार उसळला असून, या घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने परिसरात कर्फ्यू लागू केला असून, आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमारासह अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर करावा लागला आहे.
पश्चिम कार्बी आंगलोंग जिल्ह्यातील व्हिलेज ग्राझिंग रिझर्व्ह (व्हीजीआर) आणि प्रोफेशनल ग्राझिंग रिझर्व्ह (पीजीआर) जमिनींवरील बेकायदेशीर कब्जा हटवण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू होते. मात्र या आंदोलनाला अचानक हिंसक वळण लागले. संतप्त जमावाने तीन दुचाकींना आग लावली, त्यामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला.
परिस्थिती अधिक चिघळू नये, तसेच हा हिंसाचार इतर जिल्ह्यांमध्ये पसरण्याची शक्यता लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम 163 लागू केले आहे. पुढील आदेशापर्यंत हे कलम लागू राहणार असून, जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
असामाजिक घटकांकडून जातीय अथवा सांप्रदायिक तणाव निर्माण होऊ नये आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. परिसरात पोलिस, निमलष्करी दल आणि अतिरिक्त सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. दरम्यान, २२ तारखेला आंदोलकांनी कार्बी आंगलोंग ऑटोनॉमस कौन्सिल (केएएसी) चे मुख्य कार्यकारी सदस्य (सीईएम) तुलीराम रोंगांग यांच्या वडिलोपार्जित घराला आग लावल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर आंदोलन अधिक तीव्र झाले असून, बहुसंख्य आंदोलक बिहारमधील बेकायदेशीर अतिक्रमणधारकांना चराई जमिनीवरून हटवण्याची ठाम मागणी करत आहेत. परिस्थितीवर प्रशासनाची करडी नजर असून, नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



