नागपूर : वृत्तसंस्था
“महाराष्ट्रावर आणि मुंबईवर अतिक्रमण सुरू आहे. मुंबई बळकावण्याचा आणि तिला गुजरातच्या दावणीला बांधण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे मुंबई वाचवण्यासाठी आणि तिचे रक्षण करण्यासाठी लढावे लागेल,” असे स्पष्ट मत काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.
नागपुरात माध्यमांशी संवाद साधताना वडेट्टीवार यांनी महायुती सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, मुंबईतील जमिनी गिळण्याचे काम सुरू असून, आता मुंबईवर गुजरातचे नियंत्रण दिसू लागले आहे. यामुळे मराठी अस्मिता आणि मराठी संस्कृतीच्या रक्षणासाठी संघर्ष करावा लागणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला.
मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे बंधू एकत्र आल्याबद्दल प्रतिक्रिया देताना वडेट्टीवार म्हणाले, “कुटुंब एकत्र येत असेल तर आनंदच आहे. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत.” मात्र, मुंबई महापालिका निवडणुकीबाबत काँग्रेसची भूमिका स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, काँग्रेसची तयारी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षांसोबत निवडणूक लढण्याची होती, मात्र मनसेसोबत जाण्याची काँग्रेसची तयारी नव्हती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, मित्रपक्ष वेगवेगळे लढले तरी त्याचा इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही. “लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी होती, विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असतात आणि निर्णय स्थानिक पातळीवर घेतले जातात,” असे त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस पक्षाच्या भूमिकेवर बोलताना वडेट्टीवार म्हणाले, “काँग्रेस हा जातीयवाद किंवा धर्मवाद करणारा पक्ष नाही. काँग्रेस संविधान मानणारा आणि समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देणारा पक्ष आहे.” येणाऱ्या निवडणुकांमध्ये विकासाच्या मुद्द्यावर जनतेने काँग्रेसच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.



