मुंबई : वृत्तसंस्था
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची अधिकृत घोषणा झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या युतीवर जोरदार टीका करत खिल्ली उडवली आहे. ठाकरे बंधूंची युती ही कोणतीही राजकीय क्रांती नसून, केवळ स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी दोन पक्ष एकत्र आल्याचा दावा फडणवीस यांनी केला.
फडणवीस म्हणाले, “काही प्रसारमाध्यमे असे चित्र उभे करत आहेत की जणू रशिया आणि युक्रेनची युती होत आहे. एकीकडे पुतीन आणि दुसरीकडे झेलेन्स्की निघाले आहेत. प्रत्यक्षात ही युती अस्तित्वासाठी केलेली धडपड आहे.” ठाकरे बंधू म्हणजे मुंबई किंवा मराठी नाहीत, असे ठामपणे सांगत त्यांनी या युतीचा कोणताही परिणाम महायुतीवर होणार नसल्याचा विश्वास व्यक्त केला.
ठाकरे बंधू एकत्र आले याचा आनंद असल्याचे सांगतानाच, या युतीमुळे राजकीय फेरबदल होतील, हा समज चुकीचा असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. “ही दोन अस्तित्वहीन पक्षांची युती आहे. याचा अर्थ काढण्याचे काहीच कारण नाही,” असा टोला त्यांनी लगावला.
मुंबईकरांनी सातत्याने विश्वासघात अनुभवल्यामुळे ठाकरे बंधूंवर आता विश्वास ठेवणार नाहीत, असा दावा करत फडणवीस म्हणाले की, मराठी माणूसही त्यांच्या सोबत नाही आणि अमराठी मतदारही नाहीत. “यांचा ट्रॅक रेकॉर्ड भ्रष्टाचाराचा आणि स्वहिताचा आहे. निवडणुकीपुरते भावनिक भाषण केले जाते, पण जनता आता भुलणार नाही,” अशी टीका त्यांनी केली.
ठाकरे बंधूंनी आणखी काही पक्ष सोबत घेतले तरी मुंबईकर महायुतीच्या पाठीशीच उभे राहतील, असा विश्वास व्यक्त करत फडणवीस म्हणाले, “महायुतीने विकास दाखवला आहे. मराठी माणसाला मुंबईत हक्काची घरे देण्याचे काम आम्ही केले आहे. त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर मुंबईकर महायुतीलाच कौल देतील.”
ठाकरे बंधू म्हणजे मुंबई नाहीत, मराठी नाहीत, असे पुन्हा ठासून सांगत फडणवीस म्हणाले, “ही प्रीतिसंगमाची नाही, तर भीतीसंगमाची युती आहे.” उद्धव ठाकरे विकासावर एक शब्द बोलतील तर एक हजार रुपये देण्याची घोषणा आठवण करून देत त्यांनी, “माझे हजार रुपये अजून वाचले आहेत,” असा टोमणाही मारला. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलताना फडणवीस म्हणाले, “मी हिंदुत्वात जन्मलो आणि हिंदुत्वातच मरणार. मतांसाठी भूमिका बदलणारे आम्ही नाही. मुंबई आणि महाराष्ट्र हिंदुत्ववादीच आहे.” जे हिंदुत्वापासून दूर जातात, त्यांची अवस्था काय होते, हे विधानसभेच्या निवडणुकीत दिसून आल्याचेही त्यांनी नमूद केले.



