बीड : प्रतिनिधी
जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येप्रकरणी आज विशेष मकोका न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीत न्यायालयाने आरोपींवरील आरोप अधिकृतपणे निश्चित केले असून, वाल्मिक कराडसह सर्व आरोपींनी आपल्यावरील आरोप मान्य नसल्याचे स्पष्ट केले. या खटल्याची पुढील सुनावणी दि. ८ जानेवारी रोजी होणार आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण राज्यात तीव्र संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणातील काही धक्कादायक छायाचित्रे आणि मारहाणीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जनआक्रोश अधिक तीव्र झाला. बीडसह राज्यातील विविध जिल्ह्यांत मोर्चे काढण्यात आले होते. या प्रकरणात एक आरोपी अद्याप फरार असून उर्वरित आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
या हत्येप्रकरणात राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचे नाव समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळातही मोठे पडसाद उमटले होते. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद स्वतःकडे घेतले.
आजच्या सुनावणीदरम्यान न्यायालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम आणि ॲड. बाळासाहेब कोल्हे हे न्यायालयात उपस्थित होते. सर्व आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले. सुनावणीदरम्यान न्यायालयाने आरोपींवरील आरोपांचे सविस्तर वाचन केले.
सुनावणीनंतर माध्यमांशी बोलताना विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांनी सांगितले की, “खंडणीला अडथळा ठरल्यामुळे संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली, हे आरोप आज निश्चित करण्यात आले आहेत. आरोपींच्या वकिलांकडून खटला लांबवण्याचा आणि दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र न्यायालयाने हे सर्व लक्षात घेऊन आरोप निश्चित केले आहेत.”
लवकरच प्रत्यक्ष पुरावे सादर करण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हा खटला फास्टट्रॅक पद्धतीने चालवून लवकरात लवकर निकाल लावण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही ॲड. निकम यांनी सांगितले. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पुढील सुनावणी ८ जानेवारी रोजी होणार असून, या टप्प्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.


