जळगाव : प्रतिनिधी
राज्यातील २९ महापालिकांसाठी होणाऱ्या महापालिका निवडणुका २०२६ अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असून, आजपासून अधिकृतपणे निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होऊन ३० डिसेंबरपर्यंत चालणार आहे. ३१ डिसेंबर रोजी अर्जांची छाननी, तर २ जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली आहे. ३ जानेवारी रोजी अंतिम उमेदवार यादी व निवडणूक चिन्हांचे वाटप होणार असून, १५ जानेवारी २०२६ रोजी एकाच टप्प्यात मतदान, तर १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहेत.
अवघे २३ दिवस हातात असताना राज्यातील राजकीय वातावरण प्रचंड तापले असून, प्रत्यक्ष निवडणूक तयारीपेक्षा युती-आघाडीतील गोंधळ आणि जागावाटपाच्या तिढ्यामुळेच अधिक चर्चा रंगताना दिसत आहेत.
निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊनही महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. मुंबईसह राज्यातील बहुतांश महापालिकांमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे गटाची शिवसेना एकत्र लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, स्थानिक पातळीवरील कुरबुरी आणि जागावाटपावरून वाद उफाळून येत आहेत. पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आमनेसामने येण्याची चिन्हे आहेत. ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिकांमध्येही भाजप व शिंदे गटातील शिवसेनेत जागावाटपावरून खणाखणी सुरूच आहे.
दुसरीकडे महाविकास आघाडीतही अद्याप अंतिम चित्र स्पष्ट झालेले नाही. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) यांच्यात चर्चा सुरू असली तरी ठोस निर्णय झालेला नाही. त्यातच सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला आहे तो म्हणजे ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीचा. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील युतीची औपचारिक घोषणा आज होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शिवडीतील तीन प्रभागांवरील वादावर तोडगा निघाला असून दोन जागा ठाकरे गटाच्या शिवसेनेला आणि एक जागा मनसेला देण्यावर सहमती झाल्याचे समजते.
मात्र, सर्वच ठिकाणी समन्वय सहज होत नसून भांडूप येथील वॉर्ड क्रमांक ११४ वरून ठाकरे गट आणि मनसेमध्ये रस्सीखेच सुरू असल्याची माहिती आहे. काही प्रभागांमध्ये दोन्ही पक्षांची ताकद असल्याने उमेदवारीवरून पेच निर्माण झाला असून, थेट उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या पातळीवरून तोडगा काढला जात असल्याचे बोलले जात आहे. या संभाव्य युतीकडे मुंबईसह राज्यभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, प्रत्यक्ष घोषणा झाल्यास महापालिका निवडणुकांचे राजकीय समीकरण पूर्णपणे बदलू शकते, असे निरीक्षकांचे मत आहे.


