पुणे : वृत्तसंस्था
आगामी पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात नवे समीकरण आकाराला येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला मित्रपक्ष असलेल्या भाजपला शह देण्यासाठी थेट काँग्रेसशी हातमिळवणी करण्याचे प्रयत्न सुरू केल्याची माहिती आहे. याच अनुषंगाने अजित पवार यांनी काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केल्याचे समोर आले आहे.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजप राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवणार, असा अंदाज बांधला जात असतानाच अजित पवारांनी काँग्रेसकडे मैत्रीचा हात पुढे केल्याने राजकीय चर्चांना वेग आला आहे.
एका मराठी वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, अजित पवार व सतेज पाटील यांच्यात पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेत संभाव्य आघाडीबाबत प्राथमिक चर्चा झाली आहे. जर ही युती प्रत्यक्षात आली, तर या दोन महापालिकांतील राजकीय समीकरण पूर्णपणे बदलू शकते आणि भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अलीकडेच भाजपला ‘कुठल्याही कुबड्यांची गरज नाही’ असे विधान केले होते. यामुळेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत भाजप शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसला कितपत सोबत ठेवेल, याबाबत सत्ताधारी घटकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. हाच धोका ओळखून अजित पवारांनी काँग्रेसशी जवळीक वाढवण्याचा प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे.
दरम्यान, अजित पवार पुण्यात शरद पवार यांना सोबत घेण्याचीही चाचपणी करत असल्याची माहिती आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि शरद पवार गट एकत्र आल्यास भाजपसमोर मोठे आव्हान उभे राहू शकते, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अलीकडील निवडणुकांत भाजपने राज्यभरात ११७ नगराध्यक्ष निवडून आणले, तर शिंदे गटाचे ५३ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ३७ नगराध्यक्ष निवडून आले. अर्थखाते राष्ट्रवादीकडे असतानाही महायुतीत तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागल्याने अजित पवार नव्या राजकीय डावपेचांच्या तयारीत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.


