मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी जनतेचे आभार मानत पक्षाच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले. मात्र, याच निकालांवर न थांबता त्यांनी आता राज्यातील आगामी २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर बसवण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य कार्यकर्त्यांसमोर ठेवले आहे. त्याचबरोबर महायुतीमधील मित्रपक्षांकडून होणाऱ्या पदाधिकारी ‘फोडाफोडी’वर नाराजी व्यक्त करत या विषयावर मुंबईत सविस्तर चर्चा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांबाबत भाष्य करताना अजित पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसने या निवडणुकांमध्ये मर्यादित जागांवर उमेदवार उभे केले होते. तरीही अनेक ठिकाणी पक्षाला चांगले यश मिळाले असून, या निकालांवर पक्षाचे नेतृत्व आणि कार्यकर्ते समाधानी आहेत. भाजप तसेच शिवसेना (शिंदे गट) यांनीही चांगली कामगिरी केल्याचे त्यांनी मान्य केले. मात्र, आगामी निवडणुकांसाठी अजून अधिक प्रभावीपणे जमिनीवर काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी इंदापूर, भोर, फुरसुंगी आणि उरळी देवाची येथील मतदारांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल त्यांनी विशेष आभार मानले.
महायुतीतील अंतर्गत समन्वयाबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, मित्रपक्षांनी एकमेकांचे पदाधिकारी घेऊ नयेत, असे आधीच ठरले होते. मात्र काही ठिकाणी हे संकेत पाळले गेले नाहीत. अशा प्रकारांमुळे मूळ पक्षातील कार्यकर्ते नाराज होतात व त्याचा फटका निवडणुकीत बसतो. त्यामुळे या विषयावर मुंबईत सर्व संबंधितांशी चर्चा करून तोडगा काढला जाईल, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, आगामी महानगरपालिका निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत एकत्र लढण्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर अजित पवार यांनी स्थानिक राजकीय परिस्थितीवर भर दिला. आम्ही महायुतीत असलो तरी आमच्या कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त संधी मिळावी, ही आमची भूमिका आहे. त्यामुळे प्रत्येक शहरातील राजकीय समीकरण पाहून शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्ष योग्य निर्णय घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील २९ महानगरपालिकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर व्हावा, ही पक्षाची इच्छा असून, त्यादृष्टीने सध्या पुण्यासह विविध शहरांत चाचपणी सुरू असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. शहरांच्या विकासासाठी कार्यकर्त्यांना ताकद देत राष्ट्रवादी काँग्रेस कटिबद्ध राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


