धरणगाव : प्रतिनिधी
धरणगाव नगरपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळपासून सुरुवात झाली असून, निकालाच्या पहिल्या काही फेऱ्यांमध्ये नगराध्यक्ष पदाच्या लढतीत चुरशीचे चित्र पाहायला मिळत आहे. यात प्रभाग १ मध्ये लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी धरणगाव शहर विकास आघाडीच्या लीलाबाई सुरेश चौधरी हे ४९० मतदानाने आघाडीवर, तर महाराष्ट्र जनविकास आघाडीच्या भावे वैशाली विनय यांना ३२३ पाठलागावर असल्याची माहिती समोर येत आहे. सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये प्रभागनिहाय मतमोजणीत आघाडी–पिछाडी बदलताना दिसत असून, काही प्रभागांमध्ये जनविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारल्याने निवडणूक आणखी अटीतटीची बनली आहे. त्यामुळे अंतिम निकालाबाबत अद्यापही स्पष्ट चित्र समोर आलेले नाही.

दरम्यान, नगराध्यक्ष पदासह ९ प्रभागांतील नगरसेवक पदांची मतमोजणी सुरू असून, काही प्रभागांमध्ये विकास आघाडी तर काही ठिकाणी जनविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर असल्याचे संकेत मिळत आहेत. यामुळे नगरपरिषदेत बहुमत कोणाला मिळणार, याबाबत उत्सुकता अधिक वाढली आहे. मतमोजणी केंद्रावर दोन्ही आघाड्यांचे पदाधिकारी, उमेदवार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असून, प्रत्येक फेरीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुढील फेऱ्यांमध्ये चित्र पालटण्याची शक्यता असल्याने धरणगावच्या सत्तेचा फैसला अखेरच्या फेरीपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


