मुंबई : वृत्तसंस्था
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज राज्य निवडणूक आयोगावर जोरदार टीका करत आयोग भाजपचीच ‘बी-टीम’ म्हणून काम करत असल्याचा गंभीर आरोप केला. शनिवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधताना वडेट्टीवार म्हणाले, “एवढा नालायक आणि निद्रावस्थेत असलेला निवडणूक आयोग कुठेही नाही. निवडणुकांच्या आधी सरकारी तिजोरीची लूट करून पैसे वाटायचे आणि त्यातून निवडणुका जिंकायच्या हा भाजपचा धंदा झाला आहे.”
त्र्यंबकेश्वर नगरपरिषद निवडणुकीचा उल्लेख करत त्यांनी आरोप केला की, भाजपकडून एकेका मतासाठी तब्बल ५० हजार रुपये वाटण्यात आले. “सध्या सर्वत्र बोगस मतदान आणि व्होटचोरी सुरू आहे. अधिकाऱ्यांवर दबाव टाकून, धमकावून निकाल फिरवले जात आहेत,” असा आरोप त्यांनी केला.
वडेट्टीवार यांनी बिहारमधील एका माजी केंद्रीय मंत्र्याच्या विधानाचा दाखला देत मतचोरीचे गंभीर स्वरूप अधोरेखित केले. “मी २७०० मतांनी हरलो होतो, पण जिल्हाधिकाऱ्यांनी मला जिंकवले, असे तो स्वतः सांगतो. यावरून मतचोरी किती उघडपणे सुरू आहे, हे स्पष्ट होते,” असे ते म्हणाले. तसेच २००९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मध्य प्रदेशातील एका घटनेचा उल्लेख करत त्यांनी, बंदुकीच्या धाकाने जिल्हाधिकाऱ्यांकडून निकाल बदलवण्यात आल्याचा दावाही केला.
मुंबईतील बोगस मतदारांच्या मुद्द्यावरूनही वडेट्टीवारांनी निवडणूक आयोगाला लक्ष्य केले. “मुंबईत किमान १५ लाख बोगस मतदार आहेत. एका मतदाराचे नाव ३-४ वेळा नोंदलेले आहे. तक्रारी करूनही निवडणूक आयोग काहीच करत नाही. उलट सत्ताधाऱ्यांना कशी मदत होईल, हेच त्याचे काम आहे,” असा आरोप त्यांनी केला.
नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद नगरपरिषद निवडणुकीदरम्यान मतदारांना डांबून ठेवल्याच्या घटनेवर भाष्य करताना वडेट्टीवार म्हणाले, “भाजपला हार दिसली की तो कोणत्याही थराला जातो. कुणाला डांबून ठेवतात, कुणाला मारतात, तर कुणाला पैशांचा पाऊस पाडून विकत घेतात. एकेका मतदाराला पाच हजार रुपये वाटले जात आहेत. एवढे पैसे येतात कुठून?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
निवडणूक आयोगावर टीकेची धार वाढवत वडेट्टीवार म्हणाले, “निवडणूक आयोगाचे काम फक्त निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यापुरते उरले आहे. बोगसपणा सुरू असतानाही आयोग डोळे झाकून बसलेला आहे. लोकशाहीत निवडणूक आयोगाची अशी भूमिका असते का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, अजित पवार यांच्या ‘स्वबळाच्या’ भूमिकेवरही त्यांनी टीका केली. “हा भाजपचाच डाव आहे. काँग्रेसच्या धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी मतांमध्ये फूट पाडण्यासाठीच अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महायुतीबाहेर लढायला लावले जात आहे,” असा आरोप करत त्यांनी भाजपवर राजकीय कटकारस्थान रचल्याचा दावा केला.
विजय वडेट्टीवारांच्या या आक्रमक आरोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापले असून, निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.


