मुंबई : वृत्तसंस्था
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी भाजप व सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका करत, आपले राजकारण सत्तेसाठी नसून मूल्यांसाठी असल्याचे ठामपणे सांगितले. “आम्हाला जर फक्त खुर्चीची आणि सत्तेची चिंता असती, तर आम्ही केव्हाच भाजपसोबत गेलो असतो. मात्र आमचे राजकारण मूल्यांवर आधारित आहे,” असे स्पष्ट शब्दांत त्यांनी सांगितले. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी शहरातील वाहतूक कोंडी, पर्यावरणाचा ऱ्हास आणि बिघडलेली कायदा-सुव्यवस्था या मुद्द्यांवर सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले.
भाजपच्या कार्यपद्धतीवर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले, “देशातील एक तरी असे शहर दाखवा, जिथे भाजपशासित कारभारामुळे प्रत्यक्ष सुधारणा झाल्या आहेत. जिथे भाजप सत्तेत आली, तिथे विकासाऐवजी उलट प्रवास सुरू झाला आहे. प्रत्यक्ष काम करण्याऐवजी नावबदल, समाजात फूट पाडणे, हीच त्यांची पॉलिसी आहे,” असा आरोप त्यांनी केला.
पुण्यातील नागरी प्रश्नांवर भाष्य करताना त्यांनी वैयक्तिक अनुभव मांडला. “मुंबई-पुणे अंतर आज कधी नव्हे इतके मोठे वाटते. हिंजवडीसारख्या भागात अवघ्या २५ मिनिटांच्या अंतरासाठी दोन तास लागत आहेत. याचा थेट परिणाम गुंतवणूक आणि रोजगारावर होत आहे. पुणे पूर्वी इतक्या सहज पाण्याखाली जात नव्हते, पण आता दरवर्षी परिस्थिती गंभीर होत चालली आहे. ही लोकसंख्येची नव्हे, तर प्रशासकीय अपयशाची कोंडी आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटच्या नावाखाली नदीचे पात्र अरुंद केले जात असल्याचा आरोप करत आदित्य ठाकरे यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. “नदी पात्र खोल करण्याऐवजी अरुंद करणे, हे जगातले एकमेव उदाहरण पुण्यात घडतेय. यामुळे भविष्यात ११ मंदिरे आणि चार रस्ते पाण्याखाली जाण्याचा धोका आहे,” असा इशाराही त्यांनी दिला. वेताळ टेकडीवरील प्रस्तावित रस्ता आणि बोगदा हा ‘विकास’ नसून ‘विनाश’ असल्याचे सांगत, आपण मंत्री असताना या प्रकल्पाला स्थगिती दिल्याची आठवण त्यांनी करून दिली.
राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना आदित्य ठाकरे म्हणाले, “पुण्यात टोळीयुद्ध, ड्रग्जचा वाढता प्रसार ही गंभीर बाब आहे. राज्यात खरंच गृहमंत्री आहेत का, असा प्रश्न पडतो. भ्रष्टाचाराच्या किंवा तुरुंगाच्या भीतीने काही लोक भाजपकडे जात आहेत, पण जे प्रामाणिकपणे काम करू इच्छितात, त्यांच्यासाठी आमचे दरवाजे कायम खुले आहेत,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
आदित्य ठाकरे यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे पुण्यासह राज्याच्या राजकारणात नव्या चर्चेला उधाण आले असून, सत्ताधाऱ्यांविरोधात विरोधकांची धार अधिक तीव्र होत असल्याचे चित्र आहे.


