जामनेर : प्रतिनिधी
गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या जामनेर येथील २७ वर्षीय तरुणाचा मृतदेह रामदेववाडी परिसरातील घनदाट जंगलातील तलावात पोत्यात बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्याने जळगाव जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. जुन्या किरकोळ वादातून या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे तपासात उघड झाले असून, एमआयडीसी पोलिसांनी गुजरात राज्यातून दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.
सविस्तर वृत्त असे कि, जामनेर शहरातील दत्त चैतन्य नगर येथील रहिवासी निलेश राजेंद्र कासार (वय २७) हा तरुण १५ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजेपासून अचानक बेपत्ता झाला होता. निलेशचा मोबाईल बंद असल्याने नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला, मात्र तो मिळून आला नाही. दरम्यान, रामदेववाडी परिसरात त्याची दुचाकी आढळून आल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.
या प्रकरणाचा तपास करताना एमआयडीसी पोलिसांना गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले. त्यानुसार पोलिसांनी पथक पाठवून गुजरात येथून भूषण बाळू पाटील व दिनेश चौधरी (महाजन) या दोन संशयितांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या कसून चौकशीत जुन्या वादाच्या रागातून निलेशची हत्या केल्याची कबुली त्यांनी दिली. हत्या केल्यानंतर मृतदेह पोत्यात भरून रामदेववाडी येथील जंगलातील तलावात टाकून दिल्याची माहितीही त्यांनी दिली.
संशयितांच्या माहितीनुसार शुक्रवारी (दि. १९) सकाळी एमआयडीसी पोलिसांनी शिरसोली ते रामदेववाडी दरम्यानच्या जंगलात शोधमोहीम राबवली. सकाळी सुमारे १० वाजता रामदेववाडी येथील तलावातील पाण्यात पोत्यात बांधलेला निलेशचा मृतदेह आढळून आला.
या घटनेमुळे जामनेर व जळगाव परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला आहे. पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


