जळगाव : प्रतिनिधी
निंभोरा येथील पाच वर्षांच्या चिमुकल्याला रात्री फिरायला नेण्याचा वडिलांचा निर्णय अखेर जीवघेणा ठरला. दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या लक्ष्य शंकोपाल याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे निंभोरा व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
निंभोरा येथे वास्तव्यास असलेले कैलास शंकर शंकोपाल हे मंगळवारी रात्री घराबाहेर फिरण्यासाठी निघाले होते. यावेळी पत्नीने थंडीच्या रात्री लहान मुलाला बाहेर नेऊ नये, अशी विनंती केली होती. मात्र, त्या सूचनेकडे दुर्लक्ष करून त्यांनी पाच वर्षांचा मुलगा लक्ष्य याला दुचाकीवर सोबत घेतले. भुसावळकडून निंभोऱ्याकडे येत असताना वरणगाव रोडवरील हॉटेल शेर-ए-पंजाबजवळ महामार्गावरील दुभाजकावर त्यांच्या दुचाकीचा जोरदार अपघात झाला.
या अपघातात कैलास शंकोपाल यांना किरकोळ दुखापत झाली; मात्र, लक्ष्यच्या डोक्याला गंभीर मार बसला. गंभीर जखमी अवस्थेत लक्ष्यला तातडीने उपचारासाठी शहरातील तीन रुग्णालयांत नेण्यात आले. मात्र, ती बालरुग्णालये नसल्याने अखेर त्याला बालरुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असतानाच लक्ष्यने अखेरचा श्वास घेतला.
या घटनेची बाजारपेठ पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून हवालदार तेजस पारिसकर पुढील तपास करीत आहेत. लक्ष्यच्या आकस्मिक मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसर शोकमय झाला आहे. बुधवारी बोरावल येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.



