जळगाव : प्रतिनिधी
कंपनीतून घरी परतणाऱ्या उद्योजक संजय रामगोपाल तापडीया यांचा वाहनाचा पाठलाग करीत रिक्षातून आलेल्या टोळक्याने त्यांना थांबवून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना मंगळवार दि. १७ डिसेंबर रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्याजवळ घडली. या हल्ल्यात तापडीया यांच्या डोक्यावर टणक वस्तूने वार करण्यात आल्याने ते गंभीर जखमी झाले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून संशयितांचा शोध सुरू आहे.
सविस्तर वृत्त असे कि, एमआयडीसी परिसरात वास्तव्यास असलेले संजय तापडीया हे नेहमीप्रमाणे रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास (एमएच-१९, ईपी-१८१०) क्रमांकाच्या कारने कंपनीतून घरी जात होते. यावेळी एका रिक्षाने त्यांच्या कारचा पाठलाग केला. काही अंतरावर रिक्षातील चार ते पाच जणांनी त्यांची कार अडवून तापडीया यांना जबरदस्तीने बाहेर काढले. “तुम्ही आम्हाला कट मारला,” असा आरोप करीत टोळक्याने त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यातील एकाने टणक वस्तूने डोक्यावर वार करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
जखमी तापडीया यांना त्यांचा मुलगा यांनी तातडीने डॉ. किशोर बडगुजर यांच्याकडे उपचारासाठी दाखल केले. उपचारानंतर त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या घटनेनंतर शहरातील उद्योजकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. जिंदाचे अध्यक्ष रवि लढ्ढा, भाजप उद्योग आघाडीचे प्रमुख अरुण बोरोले, लघु उद्योग भारतीचे विभागीय प्रमुख समीर साने, लक्ष्मीकांत मणियार, महेंद्र रायसोनी, अंजनी मुंदडा, रवि फालक, दिनेश राठी, किशोर ढाके, राजीव बियाणी यांच्यासह मोठ्या संख्येने उद्योजकांनी तापडीया यांची भेट घेतली.
दरम्यान, राज्याचे मंत्री गिरीश महाजन, आमदार राजूमामा भोळे, माजी महापौर नितीन लढ्ढा तसेच भाजप नेते अरविंद देशमुख यांनी रुग्णालयात भेट देत तापडीया यांच्या तब्येतीची चौकशी केली आणि या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध केला.


