भुसावळ : प्रतिनिधी
शहरातील जळगाव नाका परिसरात बुधवारी रात्री पानाच्या टपरीवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेने एकच खळबळ उडाली होती. या घटनेच्या पुढील तपासात भुसावळ पोलिसांनी अत्यंत वेगाने हालचाली करत गुरुवारी पहाटेच्या सुमारास तीन संशयितांना ताब्यात घेतले. विशेष म्हणजे हे तिघेही संशयित आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणातील चौथ्या संशयित आरोपीचा शोध सुरू असून त्यालाही लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव नाका परिसरात लुटमारीच्या उद्देशाने पानाच्या टपरीवर आलेल्या चौघांपैकी एकाने विरोध करणाऱ्या उल्हास गणेश पाटील (वय ३९) याच्यावर थेट गोळीबार केला होता. या घटनेनंतर आरोपी पसार झाले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवत विविध पथके सक्रिय केली. सीसीटीव्ही फुटेज, गुप्त माहिती तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयितांची ओळख पटवण्यात आली.
पोलिसांनी केलेल्या कारवाईत ताब्यात घेतलेल्या तीन अल्पवयीन संशयितांकडून एक विना नंबरची मोटारसायकल तसेच एक गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे. गोळीबारासाठी याच कट्ट्याचा वापर करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. जप्त करण्यात आलेल्या साहित्यामुळे तपासाला महत्त्वपूर्ण दिशा मिळाली असून उर्वरित आरोपींपर्यंत पोहोचणे सुलभ झाले आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपरपोलिस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस निरीक्षक राहुल भंडारे यांच्यासह पोलिस कॉन्स्टेबल संदीप पालवे, भूषण चौधरी, राहुल बेनवाल, राहुल भोई, कुणाल सोनवणे, दीपक शेवरे आणि जावेद तडवी यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली.


