धाराशिव : वृत्तसंस्था
धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यात कंडारी ते सोनारी रस्त्यावर झालेला संशयास्पद अपघात अखेर खुनाचा असल्याचे उघड झाले आहे. जुन्या भांडणाच्या रागातून दोन मित्रांनी आपल्याच ३५ वर्षीय मित्राच्या डोक्यात जड वस्तूने वार करून क्रूरपणे खून केल्याचा गंभीर आरोप मयताच्या पत्नीने केला आहे. या प्रकरणी आंबी पोलिसांनी तात्काळ खुनाचा गुन्हा दाखल करून दोन्ही संशयित आरोपींना रात्रीच ताब्यात घेतले असून, परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मयत मोतीराम जाधव हे सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास कुटुंबासह घरी जेवण करत असताना त्यांचे मित्र विष्णु कालीदास तिंबोळे आणि योगेश नागेश तिंबोळे हे मोटारसायकलवरून त्यांच्या घरी आले. पप्पू रावखंडे यांच्या बंगल्यावर पार्टी असल्याचे सांगून त्यांनी मोतीराम यांना जेवणाच्या ताटावरून उठवले व मोटारसायकलवर बसवून सोबत घेऊन गेले.
रात्री दहा वाजण्याच्या सुमारास विष्णु तिंबोळे हा एकटाच मोतीराम यांच्या घरी परतला आणि कंडारी–सोनारी रस्त्यावर पप्पू रावखंडे यांच्या बंगल्यासमोर अपघात झाल्याची माहिती दिली. त्यानंतर मयताची पत्नी सोनाली जाधव आणि आई रतन यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असता मोतीराम जाधव हे रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून आले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती, चेहरा ठेचलेला होता आणि रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रक्त सांडलेले होते. विशेष म्हणजे सांडलेल्या रक्तावर काही ठिकाणी पाणी व माती टाकल्याचेही आढळून आले.
अपघातात तिघांपैकी केवळ मोतीराम यांनाच गंभीर इजा कशी झाली, असा सवाल पत्नीने केला असता संशयितांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे अपघाताबाबतचा संशय अधिक बळावला. त्यानंतर सोनाली जाधव यांनी आंबी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत, मोतीराम जाधव, विष्णु तिंबोळे आणि योगेश तिंबोळे यांच्यात जुन्या वादावरून भांडण झाले होते. हा वाद तात्या रावखंडे व पप्पू रावखंडे यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला होता, ज्यात तात्या रावखंडे जखमी झाले होते, असा उल्लेख करण्यात आला आहे.
या जुन्या वैमनस्यातूनच विष्णु तिंबोळे व योगेश तिंबोळे यांनी मोतीराम जाधव यांच्या डोक्यात जड वस्तूने वार करून खून केला आणि अपघाताचा बनाव रचल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच आंबी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरक्ष खरड व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावरील परिस्थिती व फिर्यादीतील गंभीर आरोप लक्षात घेऊन पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. काही तासांतच दोन्ही संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, हा अपघात नसून पूर्ववैमनस्यातून घडलेला खून आहे का, डोक्यात कोणत्या जड वस्तूने वार करण्यात आला, तसेच तात्या रावखंडे यांना झालेल्या दुखापतीचा या खुनाशी काय संबंध आहे, याचा सखोल तपास सुरू आहे.



