मुंबई : वृत्तसंस्था
उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल करत सत्ताधाऱ्यांमधील अंतर्गत संघर्ष उघड केला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील “माणिक मोती गळाले” असा उल्लेख करत राऊतांनी मंत्रिमंडळावर टीकेची झोड उठवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे टप्प्याटप्प्याने राजकीय खेळी खेळत असून अखेरीस त्याचा सर्वाधिक फटका शिंदे गटालाच बसेल, असा इशारा त्यांनी दिला.
फडणवीस हे दीर्घ राजकीय खेळ खेळणारे नेते असून “अखेरचा घाव हा मिंध्यांवरच घालतील” असा खोचक टोला लगावत राऊतांनी शिंदे गटाच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पुढे शिंदेंचा पक्ष अस्तित्वात राहील का? असा थेट सवाल करत त्यांनी महायुतीतील दोन घटक पक्षांना सावध राहण्याचा इशारा दिला.
मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बोलताना राऊतांनी मोठा दावा केला. आपण शरद पवार यांची भेट घेणार असून आघाडीबाबत चर्चा होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज ठाकरे यांच्याशी संवाद सुरू असून काँग्रेसकडूनही सकारात्मक संकेत मिळाल्याचा दावा त्यांनी केला. “मुंबईचा महापौर हा ठाकरे बंधूंचाच असेल आणि तो अस्सल मराठी माणूस असेल,” असा ठाम विश्वास व्यक्त करत आगामी निवडणुकांत मुंबईवर ठाकरे गटाचाच झेंडा फडकणार, असा आत्मविश्वास त्यांनी दाखवला.
धनंजय मुंडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतरही संजय राऊतांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. वाल्मिक कराड अजूनही तुरुंगात असून खटला पूर्ण न झालेल्या स्थितीत गंभीर आरोप असलेल्या व्यक्तींना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान देणे हे पाप ठरेल, असे ते म्हणाले. भ्रष्टाचार आणि गुंडगर्दीच्या आरोपांमुळे फडणवीस मंत्रिमंडळातील एकाच गटाचे दोन मंत्री गेले, ही सरकारवर लागलेली मोठी काळीमा असल्याचे त्यांनी नमूद केले.
माणिकराव कोकाटे प्रकरणावर बोलताना राऊतांनी सरकारवर थेट संरक्षण दिल्याचा आरोप केला. कोकाटेंना वाचवण्याचा प्रयत्न शेवटपर्यंत सुरू असून त्यामुळे “आम्ही भ्रष्टाचाऱ्यांच्या पाठीशी आहोत” असा संदेश दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. आमदार, खासदार किंवा मंत्री कोणीही भ्रष्ट असेल तर त्यांना सत्ताधाऱ्यांकडून संरक्षण मिळते, असा आरोप करत अमित शहा–धनंजय मुंडे भेटीमागेही हाच संदेश असल्याचा दावा त्यांनी केला. महाराष्ट्रात हा संदेश देवेंद्र फडणवीस देत असून दिल्लीतून अमित शहा तोच सूर आळवत असल्याचे राऊत म्हणाले.



